कुठे गेले रामराज्य? सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालय आणि लडाखच्या स्थानिक प्रतिनिधींमधील चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाविना निष्फळ ठरल्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने लडाखच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांवरून पुन्हा एकदा घूमजाव केल्याचा आरोप करत वांगचुक यांनी, “प्राण गेले तरी वचन मोडायचे नाही, हा आदर्श मानणाऱ्या देशात सध्या कसले रामराज्य सुरू आहे?” असा संतप्त सवाल विचारला आहे.
एका व्हिडीओ संदेशाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करताना सोनम वांगचुक म्हणाले की, “कालच्या बैठकीतील भूमिकेने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमच्यात केवळ किरकोळ मुद्द्यांवर मतभेद असतील असे वाटले होते; मात्र दोन्ही बाजूंच्या भूमिकेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. लडाखसाठी प्रस्तावित विधानसभा अत्यंत मर्यादित स्वरूपाची असेल आणि मुख्य सचिव या विधानसभेच्या अखत्यारीत येणार नाहीत, अशी भूमिका केंद्राने घेतली आहे.”
हेही वाचा
कोलकाता चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आयोजकांसह ७ जणांना अटक
वांगचुक यांनी स्पष्ट केले की, लडाखमधील प्रतिनिधी संविधानाच्या सहाव्या परिशिष्टाऐवजी कलम ३७१ अंतर्गत विशेष घटनात्मक संरक्षण स्वीकारण्यास तयार झाले होते. यावर्षी मे महिन्यात लडाखचे नेते आणि गृह मंत्रालय यांच्यात झालेल्या चर्चेत लोकशाही अधिकार बहाल करण्याचे, मुख्य सचिवांसह नोकरशाही विधानसभेला उत्तरदायी ठेवण्याचे आणि कलम ३७१ अंतर्गत संरक्षण देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष बैठकीत सरकारने या सर्व आश्वासनांना हरताळ फासल्याने लडाखची जनता दुःखी, चकित आणि संतप्त झाली आहे.
आपल्याच सरकारने विश्वासघात केल्यास दाद कोणाकडे मागायची?
आपली उद्विग्नता व्यक्त करताना वांगचुक म्हणाले, “आम्ही शत्रू देशांशी लढू, देशासाठी झालेल्या प्रत्येक युद्धात लडाखची जनता लढली आहे. पण जेव्हा आपल्याच देशाचे सरकार असा विश्वासघात करते, तेव्हा कोणाकडे दाद मागायची?” चीनने लडाखबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी ठामपणे सांगितले की, “चीनला लडाखवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, आमचा शेजारी तिबेट आहे. ‘लेह ॲपेक्स बॉडी’ने चीनचा एकमुखाने निषेध केला होता आणि लडाख भारतातच आनंदी आहे. मात्र या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या तीन तासांत गृहमंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत आमच्याच देशाने आमच्याशी कसे वर्तन केले?”




