कोलकाता चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आयोजकांसह ७ जणांना अटक

Kolkata Stampede | पश्चिम बंगालमधील सर्वात मोठ्या दुर्गापूजा उत्सवादरम्यान कोलकात्यात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध ‘चोरबागान’ दुर्गापूजा मंडपात शनिवारी रात्री झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला असून किमान २५ जण जखमी झाले आहेत. मंडप कोसळण्याच्या भीतीने लाऊडस्पीकरवर करण्यात आलेल्या एका चुकीच्या घोषणेमुळे भाविकांमध्ये घबराट पसरली आणि त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ही दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान घडली. चोरबागान पूजा मंडपाचा परिसर अत्यंत अरुंद गल्ल्यांचा असून, तिथे एका वेळी केवळ तीन ते चार लोकच चालू शकतात. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे भाविकांनी मंडपात शिरण्यासाठी एकच गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अनुभवी स्वयंसेवक उपस्थित नव्हते; बहुतांश तरुण स्थानिक होते. अशातच लाऊडस्पीकरवरून “गर्दी आटोक्यात आली नाही तर मंडप कोसळू शकतो,” असा इशारा देण्यात आला. या घोषणेमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि बाहेर पडण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होऊन चेंगराचेंगरी झाली.
हेही वाचा
अभिनेता इम्रान खानची हायकोर्टात धाव; ‘भारत सोडा’ नोटीसला स्थगिती देण्याची मागणी
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इतकी मोठी गर्दी असतानाही परिसरात कोणतीही रुग्णवाहिका (अँब्युलन्स) सज्ज ठेवण्यात आली नव्हती. जखमी आणि मृतांना तातडीने जवळच असलेल्या कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयाबाहेर आपल्या नातेवाइकांचा शोध घेणाऱ्या कुटुंबीयांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत होता.
पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पश्चिम बंगाल सरकारने चौकशीसाठी एका तथ्य शोधक समितीची (Fact-Finding Panel) स्थापना केली आहे. फॉरेन्सिक आणि अग्निशामक दलाची पथके सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. या भीषण दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाइकांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींसाठी ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना अटक
या प्रकरणी कठोर पावले उचलत कोलकाता पोलिसांनी गिरीश पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५, ११० आणि ३(५) अंतर्गत स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते; त्यापैकी चोरबागान दुर्गापूजा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.




