‘गिरीशभाऊ बोलले म्हणजे मुख्यमंत्री बोलले!’ प्रतिभा शिंदेंच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
जळगावमधील आदिवासी आंदोलनादरम्यान प्रतिभा शिंदे यांचे वक्तव्य; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

जळगाव : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका अनेकदा चर्चेत असते. आंदोलनांवर तोडगा काढणे असो किंवा सरकारसमोरील अडचणी हाताळणे, महाजन यांना राजकीय वर्तुळात ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या आणि आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी त्यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ‘गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री… गिरीशभाऊ बोलले म्हणजे मुख्यमंत्री बोलतात,’ असे वक्तव्य शिंदे यांनी भरसभेत केले.
आदिवासी आंदोलनादरम्यान वक्तव्य
जळगावमध्ये गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांकडून आश्वासने देण्यात आली.
या चर्चेदरम्यान प्रतिभा शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत हे विधान केले. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
हेही वाचा – ‘ईव्हीएमवर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
‘गिरीशभाऊ बोलले म्हणजे मुख्यमंत्री बोलतात’
प्रतिभा शिंदे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष स्थान देणाऱ्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. राज्यातील विविध आंदोलनांमध्ये मध्यस्थी करणे आणि सरकारच्या वतीने चर्चा करणे, अशा भूमिकांमुळे त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
प्रतिभा शिंदे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या असल्याने त्यांच्या विधानाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र, त्यांनी हे विधान नेमक्या कोणत्या संदर्भात केले, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
जळगावमधील आदिवासी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रसंगामुळे गिरीश महाजन यांच्या राजकीय भूमिकेची आणि प्रतिभा शिंदे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.




