‘SIR ला विरोध हे फक्त निमित्त, खरा विरोध लोकशाहीला!’; प्रशांत भूषण यांच्या ‘Regime Change’ विधानावर फडणवीसांचा हल्लाबोल
‘देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा डाव उघड’; फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर प्रशांत भूषण म्हणाले, ‘लोकशाही मार्गाने सरकार बदलण्याची मागणी करणे गुन्हा नाही’

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आंदोलनाचा उद्देश ‘Regime Change’ अर्थात सत्तांतर असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
‘लोकशाही मार्गाने निवडून येण्याची शक्यता नसल्याने…’
देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मताच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने त्यांच्या तोंडून ते ‘सत्य’ बाहेर आलं. देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा डाव अखेर उघड झाला!”
फडणवीस यांनी SIR प्रक्रियेला होणाऱ्या विरोधावरही प्रश्न उपस्थित केले. “त्यांना SIR का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायचीय. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्याची शक्यता नसल्यामुळेच ‘रेजीम’ बदलण्याची भाषा!” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“सत्ता उलथून टाकायचीय, पण लोकशाही मार्गाने नव्हे. SIRला विरोध हे फक्त निमित्त. खरा विरोध आहे तो लोकशाहीला; खरा विरोध आहे तुमच्या-आमच्या पात्र मतांना,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “आता आपल्याला ठरवायचंय, लोकशाही हवी की ‘रेजीम’ बदलण्याची भाषा करणारे?” असा सवाल उपस्थित करत SIR प्रक्रियेचे समर्थन केले.
हेही वाचा – ‘२०२९ मध्ये मोदींसोबत क्रिकेट खेळणार, राहुल गांधींची विकेट घेणार’; रामदास आठवलेंचा कवितेतून टोला
प्रशांत भूषण नेमकं काय म्हणाले?
दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनाला सत्तांतराच्या लढ्याचे स्वरूप असल्याचे म्हटले होते. सरकारकडून या आंदोलनाला ‘Regime Change’ची लढाई म्हटले जात असेल, तर सत्तांतराची मागणी करण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना सरकार बदलण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने सरकार बदलण्याची मागणी करणे हा गुन्हा नसल्याचे भूषण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आणि आंदोलनाच्या उद्देशावरून भाजप आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
SIR आणि निवडणूक आयोगावरून संघर्ष
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टी, डाव्या संघटना आणि विरोधी पक्षांशी संबंधित कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दुसरीकडे, भाजपकडून या आंदोलनाच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. SIR प्रक्रियेवरील आक्षेप आणि ‘Regime Change’च्या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रिया, मतदारांच्या हक्कांचा मुद्दा आणि लोकशाही मार्गाने सत्तांतर या विषयांवर राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, सरकार बदलण्याची मागणी करणे हा लोकशाही अधिकार आहे; तर फडणवीस यांनी सत्तांतरासाठी निवडणूक हाच लोकशाही मार्ग असल्याचे अधोरेखित केले आहे.




