‘२०२९ मध्ये मोदींसोबत क्रिकेट खेळणार, राहुल गांधींची विकेट घेणार’; रामदास आठवलेंचा कवितेतून टोला
‘जो जायेगा जंतर-मंतर, उसको जाना होगा अंदर’; मतचोरीच्या आरोपांवर ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा, अभिजीत दीपके यांना RPI मध्ये येण्याची ऑफर

धाराशिव : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या शैलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “२०२९ मध्ये मी नरेंद्र मोदींसोबत क्रिकेट खेळणार आणि राहुल गांधींची विकेट घेणार,” अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला. यावेळी त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलन, मतचोरीचे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही भाष्य केले. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) मध्ये येण्याची ऑफर दिली.
‘२०२९ मध्ये राहुल गांधींची विकेट घेणार’
रामदास आठवले हे त्यांच्या खास कवितांच्या शैलीत राजकीय विरोधकांवर टीका करण्यासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी संबंधित नवा राजकीय संदर्भ निर्माण केल्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचा दावा आठवले यांनी केला. राहुल गांधी यांच्या आंदोलनांमागेही हीच नाराजी असल्याचे ते म्हणाले.
‘जो जायेगा जंतर-मंतर, उसको जाना होगा अंदर’
जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्यांना उद्देशून आठवले यांनी, “जो जायेगा जंतर-मंतर, उसको जाना होगा अंदर,” अशी टिप्पणी केली. आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यासह काही आंदोलकांवर झालेल्या अटकेच्या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले.
“काँग्रेसच्या काळात आम्ही अनेक आंदोलनं केली. त्या वेळी आम्हालाही अटक करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अटक केली जाते,” असे आठवले म्हणाले. आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचे समर्थन करताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला.
हेही वाचा – ‘कच्चा बादाम’ गाण्यावरून अंजली अरोरा वादात; कानपूरमधील कार्यक्रमाच्या आयोजकांचा कायदेशीर कारवाईचा इशारा
मतचोरीच्या आरोपांवर ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा
मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असताना रामदास आठवले यांनी त्यांची बाजू घेतली. मतचोरी झाली असल्याचा दावा करणाऱ्यांनी त्यासंबंधी पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले.
नियमांनुसार काही मतदारांची नावे वगळण्यात आली असतील, तर त्यावरून ज्ञानेश कुमार यांना थेट बडतर्फ करता येणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. विरोधक आरोप करत आहेत म्हणून संविधान धोक्यात आले, असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
अभिजीत दीपके यांना RPI मध्ये येण्याची ऑफर
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्याबाबत बोलताना आठवले यांनी त्यांचे कौतुक केले. आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्वीकारून तरुणांमध्ये जागृती करण्याचे काम दीपके करत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडून घेण्याचे आवाहन करत रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली. त्यामुळे आठवले यांच्या राजकीय टिप्पणींसोबतच दीपके यांना दिलेल्या ऑफरचीही चर्चा सुरू झाली आहे.




