महायुतीतील नाराजी दूर! सतीश चव्हाणांना शिंदेंच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा; संजय शिरसाटांची घोषणा
मराठवाडा पदवीधर निवडणुकीवरून निर्माण झालेला संभ्रम संपल्याचा दावा; ‘महायुती म्हणून एकत्र लढणार’, सतीश चव्हाणांचे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सतीश चव्हाण यांना शिंदेंच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीतील समन्वय पुन्हा प्रस्थापित झाल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची जागा असताना मित्रपक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केल्याची चर्चा झाली आणि महायुतीत बेबनाव झाल्याचे बोलले जाऊ लागले.
मात्र, शिरसाट यांनी या भूमिकेमागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, अमरावतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. महायुती तोडण्याचा त्यामागे कोणताही उद्देश नव्हता. गेल्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – FDA मध्ये मोठी खळबळ! २० हून अधिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार; तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर
‘सतीश चव्हाणांना पूर्ण पाठिंबा’
अमरावतीतील बंडखोर उमेदवाराला महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाने सहकार्य करू नये किंवा प्रचार करू नये, यावर एकमत झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले. त्यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठवाड्यात सतीश चव्हाण यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे शिरसाट म्हणाले. महायुतीत निर्माण झालेला संभ्रम आणि वाद आता शमल्याचेही त्यांनी नमूद केले.
सतीश चव्हाण म्हणाले, ‘गैरसमज दूर झाले’
दरम्यान, सतीश चव्हाण यांनीही संजय शिरसाट यांची भेट घेतल्यानंतर महायुतीतील गैरसमज दूर झाल्याचे सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण शिरसाट यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आता आम्ही महायुती म्हणून एकत्र या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास आहे. मराठवाड्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवू,” असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. आता महायुतीतील पक्ष प्रत्यक्ष प्रचारात कितपत एकत्रितपणे काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




