‘फडणवीसांचा राजकीय अभ्यास कच्चा’; ‘रिजीम चेंज’च्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
‘लोकशाहीत विरोधकांची आंदोलने सत्ताबदलासाठीच’; निवडणूक आयोग, भाजप आणि तिरंग्याच्या मुद्द्यावरून राऊतांची टीका

मुंबई : ‘रिजीम चेंज’च्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत विरोधकांची आंदोलने ही सत्ताबदलाच्या उद्देशाने होत असतात, असे सांगत राऊत यांनी भाजपच्या पूर्वीच्या आंदोलनांचा दाखला दिला. फडणवीस यांचा राजकीय अभ्यास कच्चा असून, त्यांना इतिहासाची माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी ही टीका केली.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘रिजीम चेंज’बाबत केलेले विधान लोकशाहीच्या चौकटीत असल्याचे राऊत म्हणाले. “मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात भाजपने केलेली आंदोलने कशासाठी होती? भाजपची स्थापना आणि व्ही. पी. सिंह यांना दिलेला पाठिंबा हा सत्ताबदलासाठीच नव्हता का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. भाजप आणि जनसंघाने केलेली आंदोलनेही सत्ताबदलाच्या उद्देशानेच होती, असा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोगावरही निशाणा
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरूनही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. निवडणूक आयोगाच्या मदतीने चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जात असतील, तर सत्ताबदल झाला पाहिजे, असे ते म्हणाले. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील जनआंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी या देशांमधील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. या घटनांमध्ये निवडणूक प्रक्रिया, भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील जनतेचा असंतोष हे मुद्दे महत्त्वाचे ठरल्याचा दावा राऊत यांनी केला.
“तुम्हाला वेळ असेल तर माझ्यासोबत बसा; मी तुम्हाला इतिहासाचे धडे देईन,” असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
हेही वाचा – शाकाहारी आहार म्हणजे फक्त भाजी-पोळी नव्हे! शरीराला आवश्यक पोषणासाठी ताटात ठेवा या ५ गोष्टी
तिरंग्याच्या मुद्द्यावरूनही टीका
तिरंग्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवरही निशाणा साधला. तिरंगा फडकवण्याच्या मुद्द्यावरून कोणाला अटक होत असेल, तर सत्ताबदलाची गरज असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर दीर्घकाळ तिरंगा फडकवण्यात आला नसल्याचा उल्लेख करत त्यांनी संघावरही टीका केली.
“रिजीम चेंज हा चांगला शब्द आहे. मला ‘दिमागी नक्षली’ म्हटले तरी चालेल,” असे वक्तव्य राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानांमुळे ‘रिजीम चेंज’च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




