राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात; ५२ साखर कारखान्यांना परवाने
यंदा २१२ कारखान्यांचे परवान्यासाठी अर्ज; ९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज

मुंबई : राज्यात आजपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तालयाकडून आतापर्यंत राज्यातील ५२ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामासाठी एकूण २१२ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ही माहिती दिली.
यंदाच्या हंगामात राज्यात सुमारे ९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा, तर ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगामी काळात गाळप हंगामाला वेग येऊन राज्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच गाळप हंगाम सुरळीतपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच राज्यभरातील ऊस गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी व्यक्त केला.




