पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा
मंगेश चिवटेंची माघार, भाजपचे कौस्तुभ गावडे रिंगणात; काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यामुळे चौरंगी लढतीचे चित्र

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असल्याने आता महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे समर्थित उमेदवार आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मंगेश चिवटेंची माघार; सचिन सानप यांना पाठिंबा
पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी मंगेश चिवटे यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संपर्क वाढवला होता. शिवसेनेकडून त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, युतीधर्माचे पालन करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी ‘शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार हवा’ अशी भूमिका मांडत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. शिंदे यांनी सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना पुरस्कृत उमेदवार घोषित करण्यात आले.
भाजप-शिवसेनेतील समीकरणांकडे लक्ष
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेना पुरस्कृत सचिन सानप निवडणूक लढवत असल्याने महायुतीतील दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे १८ तारखेला अमरावती दौऱ्यावर जाणार असून, तेथे विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत
पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून जयंत आसगावकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेचा पाठिंबा सचिन सानप यांना आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे चित्र आहे.
२०२० च्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे जितेंद्र पवार यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




