स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंच्या विजयासाठी महायुतीची रणनीती; चंद्रकांत पाटलांचे एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचे आवाहन
भाजप-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक; मताधिक्य वाढवण्यावर भर, ‘राजकारणात अर्ध्या मिनिटात निर्णय बदलतात’ असे पाटील म्हणाले

मुंबई : स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे महायुतीचे उमेदवार असून, दोघांचाही प्रचार चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक होणार असून, उमेदवारांचे मताधिक्य वाढवण्यासाठी रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
मताधिक्य वाढवण्यासाठी रणनीती
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज संयुक्त बैठक होणार आहे. महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच, विजयाचे मताधिक्य वाढवण्यासाठी कोणती रणनीती आखता येईल, यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेच्या कार्यालयातही अशाच प्रकारची बैठक आयोजित केली जाणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी किंवा उद्या घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – PCMC मध्ये कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी डॉक्टर निलंबित; आयुक्तांचे आदेश
‘राजकारणात काहीही होऊ शकते’
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पाटील म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकते. अर्ध्या मिनिटात निर्णय बदलतात.” सचिन सानप यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील समन्वय आणि उमेदवारांच्या विजयासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या बैठकांकडे लक्ष लागले आहे.




