TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC मध्ये कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी डॉक्टर निलंबित; आयुक्तांचे आदेश

YCM रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी; १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निलंबनाचे आदेश जारी केले. तसेच संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या अहवालानंतर कारवाई

डॉ. वैभव म्हस्के हे महापालिकेच्या गट-ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी असून, YCM रुग्णालयात कार्यरत आहेत. ते १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याची बाब रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.

रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अहवाल आणि आयुक्तांची मान्यता विचारात घेऊन प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. वैद्यकीय सेवा रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी थेट संबंधित असल्याने या सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि सचोटीने कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सेवा नियमांच्या उल्लंघनाचा ठपका

निलंबन आदेशानुसार, कर्तव्यावर असताना मद्याच्या प्रभावाखाली राहणे आणि त्यामुळे कर्तव्यपालनावर परिणाम होणे हे शासकीय सेवकांसाठी निर्धारित आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ आणि २८ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) यांच्या तरतुदींचा भंग झाल्याचा निष्कर्ष आदेशात नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ आणि महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) नुसार डॉ. म्हस्के यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध नियम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा –  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन

१५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

विभागीय चौकशीच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाला निलंबन आदेशाची अंमलबजावणी करून त्याची पोहोच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.

निलंबन काळात नियमांचे पालन बंधनकारक

निलंबन कालावधीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी विहित अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक असेल. या काळात त्यांना अन्यत्र नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. निर्वाह भत्ता मिळवण्यासाठी अन्यत्र सेवा, नोकरी किंवा व्यवसाय केला नसल्याचा स्वाक्षरीयुक्त दाखला दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक असेल.

निलंबन कालावधीत डॉ. म्हस्के यांचे मुख्यालय पिंपरी येथे राहणार असून, वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या प्रकरणात लागू सेवा नियमांनुसार पुढील कार्यवाही विभागीय चौकशीच्या निष्कर्षांनुसार केली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button