Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“माझ्याच पैशाने ‘राजासारखं’ जगलो, हीच मोठी चूक; मी अजूनही चोर आहे का?”; विजय मल्ल्याचा सवाल

नवी दिल्ली | कर्जबुडवेपणा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित करण्यात आलेला किंगफिशर एअरलाइन्सचा माजी प्रमुख विजय मल्ल्या याने पुन्हा एकदा भारतीय यंत्रणा आणि बँकांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या जुन्या आदेशाचे छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत, “मी माझ्याच पैशाने ‘राजासारखं’ आयुष्य जगलो आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. त्याबद्दल मला अजूनही शिक्षा दिली जात असून मी अजूनही चोरच आहे का?” असा सवाल मल्ल्याने उपस्थित केला आहे.

मल्ल्याने शेअर केलेल्या न्यायालयाच्या आदेशात १७ डिसेंबर २०२४ रोजी अर्थमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार, युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडमधील (UBL) शेअर्सव्यतिरिक्त मल्ल्याकडून तब्बल १४,१३१.६ कोटी रुपयांची मालमत्ता बँकांच्या समूहाकडे (Consortium) हस्तांतरित करण्यात आली आहे.

किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांचे व्याजासह मूळ कर्ज ६,२०३ कोटी रुपये होते. म्हणजेच मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक वसुली आधीच पूर्ण झाली असल्याने बँकांची थकबाकी भरून निघाली आहे, असे खंडपीठाने नमूद केले होते. त्यामुळे आता बँकांनी UBL च्या उर्वरित शेअर्सवर दावा सांगणे गैर असून, केंद्र सरकार व बँकांनी या प्रदीर्घ वादावर पडदा टाकावा, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली होती.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा; ५ गावांसह ५३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

दरम्यान, कर्जवसुलीवर भाष्य करताना न्यायालयाने मल्ल्याच्या “अतिउधळपट्टी, भपकेबाज जीवनशैली आणि वैयक्तिक अहंपणा” यामुळेच कायदेशीर तोडगा निघण्यात अडथळे आल्याचे म्हटले होते. न्यायालयाच्या याच विधानाचा आधार घेत मल्ल्याने स्वतःचा बचाव केला असून, “मी इतरांच्या नव्हे तर स्वतःच्या पैशाने अशी जीवनशैली जगलो. सर्वांच्या वर एक देव असून मला नक्कीच न्याय मिळेल,” असा दावा केला आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

ऑक्टोबर २०१२ मध्ये किंगफिशर एअरलाइन्स कर्जाच्या डोंगराखाली बंद पडल्यानंतर मार्च २०१६ मध्ये मल्ल्या लंडनला पळून गेला. आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटींच्या कर्जापासून सुरू झालेल्या तपासात ईडीने मल्ल्यावर बँकांचे कोट्यवधी रुपये परदेशातील मालमत्ता, आयपीएल संघ आणि फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये वळवल्याचा (मनी लाँड्रिंग) गुन्हा दाखल केला आहे. बँकांचे सर्व पैसे परत करण्यास आपण सुरुवातीपासून तयार होतो, असा दावा करत मल्ल्याने पुन्हा एकदा स्वतःला निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button