Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पाकिस्तानमध्ये भीषण दुर्घटना; खासगी शाळेचे छत कोसळून २७ विद्यार्थ्यांसह शिक्षिकेचा मृत्यू, ४० हून अधिक जखमी

Pakistan school roof collapse | पाकिस्तानमधील पेशावर शहरात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली. एका खासगी शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याने तब्बल २७ चिमुकल्या विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ४० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेशावर शहरातील दिर कॉलनी भागात ही तीन मजली खासगी शाळा आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू असताना अचानक शाळेच्या वरच्या मजल्याचे छत कोसळले. यावेळी वर्गामध्ये सुमारे ३० विद्यार्थी उपस्थित होते. छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे १३ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

हेही वाचा

मतदार याद्यांमधून १२ कोटी नावे का वगळली? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

या शाळेत एकूण ११० विद्यार्थी शिक्षण घेत होते. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाली करत जखमींवर उपचारासाठी रुग्णालयात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. पेशावर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संबंधित शाळेच्या मालकाला अटक केली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केला शोक

या भीषण दुर्घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. निष्पाप विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करत त्यांनी शोकाकूल कुटुंबांप्रती संवेदना प्रकट केल्या. तसेच सर्व जखमींना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित आरोग्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button