महाराष्ट्राच्या ‘डॅशबोर्ड प्रणाली’चे कर्नाटकातही अनुकरण करा; उपसभापती सचिन अहिर यांची संकल्पना
कर्नाटक विधान भवनाच्या अभ्यास दौऱ्यात कामकाजाचा घेतला आढावा; सभापती आणि उपसभापतींना महाराष्ट्र विधान भवन भेटीचे निमंत्रण

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाजासाठी प्रभावी ठरलेली ‘डॅशबोर्ड प्रणाली’ कर्नाटक राज्यातही लागू करण्याची संकल्पना विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मांडली. त्यांच्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली.
कर्नाटक विधान परिषदेचे कामकाज समजून घेण्यासाठी आयोजित या अभ्यास दौऱ्यात सचिन अहिर यांनी विधान परिषदेचे सभापती सलीम अहमद आणि उपसभापती उमाश्री यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही राज्यांतील विधिमंडळाच्या कामकाजासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कर्नाटकातही डॅशबोर्ड प्रणाली लागू करण्याची संकल्पना
महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विधिमंडळ कामकाजासाठी डॅशबोर्ड प्रणाली यशस्वीपणे राबवली जात आहे. या आधुनिक प्रणालीच्या धर्तीवर कर्नाटक सरकारनेही आपल्या राज्यात अशी प्रणाली लागू करावी, अशी सूचना उपसभापती सचिन अहिर यांनी केली.
या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे कर्नाटक शासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विधिमंडळाचे कामकाज अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्र विधान भवन भेटीचे निमंत्रण
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या विधिमंडळांमधील सहकार्य आणि सलोख्याचे संबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने सचिन अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलीम अहमद आणि उपसभापती उमाश्री यांना महाराष्ट्र विधान भवनाला भेट देण्याचे अधिकृत निमंत्रण दिले.
आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांवर चर्चा
कर्नाटक दौऱ्यात सचिन अहिर यांनी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांचीही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
या अभ्यास दौऱ्यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले उपस्थित होते.




