Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट; शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर कठोर कारवाई!

चंद्रकांतदादा पाटील यांचे विद्यापीठांना निर्देश; पेपरफुटी रोखण्यासाठी कडक उपाययोजना, २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्यावर भर

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले आहे, त्यांना ते तातडीने परत करावे. निर्देशांचे उल्लंघन करून शुल्क आकारल्याचे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क, पेपरफुटी रोखण्यासाठी उपाययोजना, निकाल प्रक्रियेतील सुसूत्रता, शैक्षणिक वेळापत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विद्यार्थी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. यामध्ये अभियांत्रिकी, कला तसेच विभागाच्या अखत्यारीतील अन्य महाविद्यालयांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडू नये, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते तातडीने परत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना

विद्यापीठांच्या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखणे आणि निकाल प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने परीक्षा गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यातील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

परीक्षेतील गैरप्रकार किंवा पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठांनी परीक्षा व्यवस्थेत आवश्यक खबरदारी घेऊन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

हेही वाचा –  महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे मिशन मोडवर नियोजन; टँकर हा शेवटचा पर्याय, बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा!

निकाल जाहीर होताच पदवी प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये

पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांचे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि पुढील शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत मिळण्यास मदत होईल.

प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार विद्यापीठांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतील. सर्व विद्यापीठांनी ही डिजिटल सुविधा तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

२०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या शैक्षणिक कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने चौथ्या वर्षाच्या ‘ऑनर्स’ पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुनर्परीक्षा आणि एटीकेटीसंदर्भातील नियमांमध्येही एकसमानता असावी, यासाठी राज्यातील विद्यापीठांकरिता समान धोरण तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकालासंबंधी नियमांबाबत स्पष्टता मिळू शकेल.

विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यापीठांना भेटी

विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील १५ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यातील विद्यापीठांना भेटी देणार आहेत.

या भेटींमध्ये विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत वसतिगृहात मुक्काम करून निवास, भोजन, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या जातील. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्याचा उद्देश असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थी निवडणुकांबाबत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दिवाळीनंतर ही प्रक्रिया पुढे नेण्याच्या दृष्टीने निवडणुका कोणत्या पद्धतीने घेता येतील, याचा सर्वंकष विचार करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, डिजिटल सुविधा उपलब्ध करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विद्यापीठांच्या कामकाजात एकरूपता निर्माण करणे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group