Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात अनधिकृत इमारती आणि फ्लॅट्सच्या नोंदणीला लगाम; ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ सुविधा लागू

दस्त नोंदणीतील कागदपत्रांची सात मुद्द्यांवर पडताळणी; UDCPR, DP प्लॅन आणि रिजनल प्लॅनच्या नियमांचे पालन आवश्यक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई : राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ ही सुविधा लागू करण्यात आली असून, दस्त नोंदणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर पडताळणी केली जाणार आहे. तसेच अनधिकृत बांधकामांमधील सदनिका आणि इमारतींच्या नोंदणीला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन आणि आवश्यक मंजुरी तपासण्यावर भर देण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली.

नव्या व्यवस्थेनुसार, दस्त नोंदणीचा उद्देश, नोंदणीसाठी दुसरा तालुका निवडण्यामागील कारण आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची वैधता यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. दस्त नोंदणीची प्रक्रिया सह दुय्यम निबंधक आणि सह जिल्हा निबंधक यांच्यामार्फत केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपाययोजनांमुळे नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी आणि संभाव्य गैरप्रकार रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

अनधिकृत इमारतींच्या नोंदणीवर निर्बंध

कष्टाच्या पैशातून घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. UDCPR, विकास आराखडा (DP Plan) आणि प्रादेशिक आराखडा (Regional Plan) यांमधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांची तसेच आवश्यक परवानग्या नसलेल्या इमारती आणि सदनिकांची नोंदणी रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नोंदणीपूर्वी संबंधित बांधकामाला सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आहे का, नियमांचे पालन झाले आहे का आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. बांधकामाच्या स्वरूपानुसार लागू असलेल्या नियमांनुसार रेरा (RERA) नोंदणी आणि संबंधित प्राधिकरणाच्या मंजुरीचीही पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा –  पुणे पदवीधरची जागा भाजपला; शिवसेनेत नाराजी कायम, एकनाथ शिंदेंनी दिला ‘युतीधर्म’ पाळण्याचा संदेश!

नियमभंग करणाऱ्या बांधकामांवर कारवाई

बावनकुळे यांनी सांगितले की, यापुढे बांधकामांची नोंदणी करताना मोजणी आणि संबंधित नियमांचे पालन यांना महत्त्व दिले जाणार आहे. एखाद्या इमारतीत नियमभंग आढळल्यास आणि तो कायदेशीररीत्या दूर करणे शक्य असल्यास आवश्यक त्रुटी दूर करून नियमानुसार मंजुरी घेणे आवश्यक असेल.

मात्र, ज्या बांधकामांचे नियमितीकरण कायद्यानुसार शक्य नाही, त्यांना कायदेशीर मान्यता मिळू शकणार नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित कायदे आणि सक्षम प्राधिकरणांच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही प्रकरणांमध्ये घरखरेदीदारांनी पैसे भरल्यानंतर बिल्डर गायब झाल्यामुळे नागरिक अडचणीत येतात. अशा परिस्थितीत घरखरेदीदारांचे हित लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढण्याबाबत सरकार विचार करेल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

घरखरेदीदारांच्या हितासाठी पडताळणीवर भर

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी विकासकांनी संबंधित विकास प्राधिकरणाच्या परवानग्या घेणे आणि लागू असलेल्या RERA नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले. नियमबाह्य बांधकामांची नोंदणी रोखणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयांमुळे घर खरेदी करताना नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळावी आणि अनधिकृत बांधकामांच्या व्यवहारांमुळे होणारी फसवणूक कमी व्हावी, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group