रणबीर कपूरच्या ‘रामायण’ च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर; साई पल्लवी आणि यशच्या लूकची उत्सुकता

Ramayana Part 1 Release Date | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण: भाग १’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला हा भव्य चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र आता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला असून हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली आहे.
दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या भव्य पौराणिक चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकारांची फौज पाहायला मिळणार असून यात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता, रवी दुबे लक्ष्मण, रॉकिंग स्टार यश लंकापती रावण, रामानंद सागर यांच्या मालिकेत रामाची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल राजा दशरथ, तर सनी देओल पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
हेही वाचा
हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांचे संगीत
या चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कारविजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. जागतिक ख्यातीचे ऑस्करविजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि भारताचे ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी एकत्रितपणे या सिनेमाला पार्श्वसंगीत व संगीत दिले आहे.
चित्रपटाच्या निर्मितीमध्ये प्राइम फोकस स्टुडिओज, तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार पटकावणारा आंतरराष्ट्रीय VFX स्टुडिओ ‘DNEG’ आणि यशची मॉन्स्टर माईंड क्रिएशन्स सहभागी आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, भव्य सेट्स आणि तंत्रज्ञानाचा वापर असलेला हा बिग बजेट सिनेमा ५ नोव्हेंबर रोजी पडद्यावर झळकणार आहे.




