चिखलीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १२०० चौरस मीटरचे अतिक्रमण जमीनदोस्त

चिखली | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ तोरणा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १, चिखली शरद नगर गल्ली नंबर आठ परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या थेट आदेशानुसार ही धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत परिसरातील एकूण ५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रावरील बेकायदा बांधकाम महापालिकेच्या पथकाने हटवले.
सदर कारवाई ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महापालिकेने चोख पूर्वतयारी केली होती. यासाठी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ आणि सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
हेही वाचा
अनाथ मुलांना सरकारी नोकऱ्यांतून संधी; महाराष्ट्रात १,०६० मुलांना रोजगार! आदिती तटकरे यांची माहिती
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये अतिक्रमण विभागाचे ६ पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) ५० जवान यांच्यासह महापालिकेचे २ मजूर आणि १० कंत्राटी मजूर सहभागी झाले होते. ही बेकायदा बांधकामे निष्कासित करण्यासाठी महापालिकेने २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि २ जेसीबी यंत्रांचा वापर करून अवघ्या काही तासांत सर्व अतिक्रमणे हटवली. महापालिकेने अचानक घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे चिखली परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, शहरात यापुढेही अशी धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




