Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अनाथ मुलांना सरकारी नोकऱ्यांतून संधी; महाराष्ट्रात १,०६० मुलांना रोजगार! आदिती तटकरे यांची माहिती

अनाथ प्रमाणपत्रांचे १२,४४३ वितरण; बाल संगोपन योजनेतून दोन लाख मुलांना दरमहा ₹२,२५० ची मदत

नवी दिल्ली : असुरक्षित बालकांना संस्थात्मक देखभालीऐवजी कुटुंब आणि समुदायाच्या आधारातून सुरक्षित संगोपन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासन बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे. फॉस्टर केअर, दत्तक प्रक्रिया आणि आफ्टर केअर अधिक प्रभावी करण्यासोबतच बालकांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय विभागीय शिखर परिषदेत महाराष्ट्रातील उपक्रमांचे सादरीकरण करताना त्या बोलत होत्या. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते. ‘प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे’ या तत्त्वावर बालकांना सुरक्षित वातावरण, संगोपन आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

अनाथ मुलांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षणाचा लाभ

मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाथ मुलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये लागू असलेल्या एक टक्का समांतर आरक्षणातून सप्टेंबर २०२६ पर्यंत १ हजार ६० मुलांना सरकारी नोकरी मिळाली आहे. यामध्ये वर्ग एकमधील ४, वर्ग दोनमधील ६८, वर्ग तीनमधील ९७४ आणि वर्ग चारमधील १४ उमेदवारांचा समावेश आहे. राज्यात या कालावधीपर्यंत सुमारे १२ हजार ४४३ अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

अनाथ मुलांच्या उच्च व तंत्रशिक्षणाचा तसेच परीक्षा शुल्काचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलत आहे. १७ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयाचा ९९ हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला आहे. याशिवाय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख मुलांना दरमहा २ हजार २५० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील १०३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सन्मान! राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पोलीस पदकांचे वितरण

बालकल्याणासाठी निधी आणि विशेष उपक्रम

जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालविकासासाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी प्रत्येकी एक टक्का निधी पायाभूत सुविधा, अंगणवाड्या आणि बालकांच्या थेट कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरला जात आहे.

झोपडपट्ट्या आणि रस्त्यांवर राहणाऱ्या तसेच भिक्षेकरी बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी २०२४-२५ मध्ये ‘फिरते पथक’ हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून सुमारे १० हजार मुलांपर्यंत पोहोचण्यात आले, तर त्यापैकी तीन हजार मुलांना नियमित शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. हा उपक्रम राज्यातील ३९ हून अधिक महानगरपालिकांमध्ये विस्तारित करण्यात येत आहे.

दत्तक प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यावर भर

दत्तक प्रक्रियेसाठी सुमारे २० ते २५ हजार अर्जदार नोंदणीकृत असले, तरी बहुतांश पालक एक ते दोन वर्षांखालील बालकांना दत्तक घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अधिक वयाच्या मुलांच्या दत्तक प्रक्रियेला अपेक्षेप्रमाणे गती मिळत नाही. बालकांना दत्तक प्रक्रियेसाठी कायदेशीरदृष्ट्या मुक्त घोषित करण्यात होणारा विलंब, फॉस्टर कुटुंबांची मर्यादित उपलब्धता आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शिक्षण, रोजगार, निवारा व कौशल्य विकासासाठी आवश्यक असलेल्या सहाय्याची कमतरता ही प्रमुख आव्हाने असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

या समस्यांवर उपाय म्हणून केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्याशी समन्वय साधून राज्य आणि विभागीय स्तरावर दत्तक प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, बालक १८ वर्षांचे होण्याच्या किमान १२ महिने आधीच आफ्टर केअर आणि स्वावलंबनाचे नियोजन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बालकल्याण समिती (CWC), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU), विशेष दत्तक संस्था (SAA) आणि CARA यांच्यात समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावरही त्यांनी भर दिला.

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन

कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार देणे गरजेचे असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.

परिषदेत अंगणवाडी केंद्रांचे नवे स्वरूप, बाल संरक्षण यंत्रणा बळकट करणे, महिलांची सुरक्षितता आणि महिला सक्षमीकरण या चार प्रमुख विषयांवर चर्चा झाली. ‘मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण २.०’, ‘मिशन शक्ती’ आणि ‘मिशन वात्सल्य’ या योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. विविध राज्यांतील प्रभावी उपक्रम, अंमलबजावणीतील अडचणी आणि त्यावरील व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

या परिषदेला विविध राज्यांतील महिला व बालविकास विभागाचे मंत्री उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button