दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर पिल्ले हॉलच्या दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात
भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि परिसर सुधारणांवर भर

पिंपरी- चिंचवड | बंगा भारतीच्या दुर्गापूजा उत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील पिल्ले हॉलमधील विविध दुरुस्ती व सुधारणांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. दुर्गादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि उत्सवाचा परिसर स्वच्छ व सोयीस्कर व्हावा, या उद्देशाने ही कामे करण्यात येत आहेत.
माजी महापौर व नेहरूनगरच्या नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पिल्ले हॉलची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुविधांची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा
पोलिसांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी राहुल-प्रियांका गांधींवर ३ गुन्हे दाखल
या कामांमध्ये ब्लॉक दुरुस्ती, परिसरातील गवत काढणे व स्वच्छता, पाण्याची टाकी बसवणे, आवश्यक विद्युत कामे, रंगकाम आणि रस्त्याची दुरुस्ती यांचा समावेश आहे. तसेच भांडी धुण्यासाठी हॉलच्या बाहेर स्वतंत्र पाण्याचा नळ बसवण्यासह इतर आवश्यक सुधारणाही करण्यात येत आहेत.
“दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गापूजा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पिल्ले हॉल आणि परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व सर्वांसाठी सोयीस्कर व्हावा, यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य दिले आहे,” असे डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी सांगितले.
दुर्गापूजा उत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छ परिसर आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पिल्ले हॉलमधील आवश्यक दुरुस्ती व सुधारणांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून कामे सुचवली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. नागरिकांची सोय आणि उत्सवाचे सुरळीत आयोजन हीच आमची प्राथमिकता आहे.
– डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, मा. महापौर व नगरसेविका.




