‘सेवा हाच माझा धर्म आणि कर्म’; पंतप्रधान मोदींनी सांगितला २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास
‘देशाने मला खूप काही दिले’; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प, ‘आत्मनिर्भर भारत’ मोदींचा निर्धार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला उजाळा देताना ‘सेवा हाच आपला धर्म आणि कर्म आहे’ असा संदेश दिला. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील प्रवासाचा आढावा घेत देशवासीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘देशाने मला खूप काही दिले आहे आणि माझ्या आजवरच्या यशात देशवासियांचा मोठा वाटा आहे,’ असे मोदी यांनी सांगितले. जनतेच्या योगदानामुळेच आपण आज या पदावर पोहोचलो असल्याचे नमूद करत त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. ‘आत्मनिर्भर भारत’ाच्या अभियानाला अधिक बळ देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी ‘वी विल डू इट’ असा आत्मविश्वासही व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा – गोकुळ निवडणुकीत महायुतीचा तिढा सुटला? मुश्रीफांची नाराजी दूर; राष्ट्रवादीला आणखी दोन जागांचा शब्द
‘पंतप्रधान होईन असे कधी वाटले नव्हते’
आपल्या आयुष्यात आपण पंतप्रधान होऊ, असे कधीही वाटले नव्हते, अशी नम्र कबुली मोदी यांनी यावेळी दिली. भारताची लोकशाही आणि संविधान यांना वंदन करत त्यांनी देशातील लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मोदी यांनी स्वतःला आजही एक विद्यार्थी मानत असल्याचे सांगितले. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हितचिंतकांनी सातत्याने प्रोत्साहन दिले, तर टीकाकारांनी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले, असेही त्यांनी सांगितले.
‘जनता माझ्यासाठी ईश्वराचे रूप’
जनता ही आपल्यासाठी ईश्वराचे रूप असल्याचे सांगत मोदी यांनी आपले सार्वजनिक जीवन केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नसल्याचे स्पष्ट केले. एका मोठ्या मिशनसाठी जगत असून देशसेवा हीच आपल्या कार्याची प्रेरणा आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
२५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील अनुभवातून मिळालेल्या शिकवणीचा उल्लेख करत त्यांनी पुढील काळातही देशाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.




