अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार; ‘घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी निर्णय’
तीन अपत्यांच्या मुद्द्यावरून उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट करत शिंदेंनी माघार जाहीर केली

अहिल्यानगर : राज्यात विधानपरिषद निवडणुकांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तीन अपत्यांच्या मुद्द्यावरून त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला जात असतानाच राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आपण कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे हा निर्णय घेतलेला नसून, घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटनात्मक तयारीचेही त्यांनी कौतुक केले. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक आणि जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी या दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव करण्यात आला असून, हा ठराव बिनविरोध झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन तालुक्यांतील ठरावावरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.
दरम्यान, राम शिंदे यांच्या जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. राम शिंदे यांना तीन अपत्ये असल्याने त्यांची उमेदवारी अपात्र ठरू शकते, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही याच मुद्द्यावरून राम शिंदे यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केला होता.
मात्र, त्यावेळी राम शिंदे यांनी आपण नियमांमध्ये राहून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा – संजय दत्तांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा पलटवार; ‘पाकिस्तानात १५ दिवस राहून पाहा’
तिसऱ्या अपत्याचा नियम चर्चेत
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील नियमांनुसार, ७ सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असल्यास संबंधित व्यक्तीला सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. याच नियमाचा संदर्भ देत राम शिंदे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले जात होते.
आता राम शिंदे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.





