Hong Kong Sixes 2026 | क्रिकेट विश्वातील सर्वांत वेगवान आणि थरारक मानल्या जाणाऱ्या ‘हाँगकाँग सिक्सेस’ (Hong Kong Sixes) स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय अनुभव आणि आयपीएलमधील धडाकेबाज खेळाडूंचा मिलाफ असलेला मजबूत संघ मैदानात उतरवला जाणार आहे.
या स्पर्धेत भुवनेश्वर कुमारसह अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या, नितीश राणा, राहुल तेवतिया, आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठी, शशांक सिंह आणि यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शशांक सिंहचा अपवाद वगळता उर्वरित सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघ:
भुवनेश्वर कुमार (कर्णधार), क्रुणाल पंड्या, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शशांक सिंह आणि टी. नटराजन.
हेही वाचा
५०० च्या नोटेवर आक्षेपार्ह रील भोवली! महात्मा गांधींची खिल्ली उडवणाऱ्या महिला इन्फ्लुएन्सरला अटक
हाँगकाँग सिक्सेसचे नियम काय आहेत?
६ खेळाडू, ६ षटके: प्रत्येक संघात फक्त सहा खेळाडू मैदानात उतरतात आणि एका डावात ६ षटके असतात.
गोलंदाजीचे नियम: यष्टिरक्षक वगळता सर्व पाच खेळाडूंना गोलंदाजी करावी लागते. यात एका गोलंदाजाला दोन षटके (सलग नाही) टाकण्याची मुभा असते, तर उर्वरित चौघे प्रत्येकी एक षटक टाकतात.
फलंदाजीचे नियम: फलंदाजाने अर्धशतक (५० धावा) पूर्ण केल्यास त्याला सक्तीने ‘रिटायर नॉटआऊट’ व्हावे लागते; मात्र संघ ऑलआऊटच्या स्थितीत आल्यास तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. पाच विकेट पडल्यास शेवटचा फलंदाज एकटाच (Last Man Standing) फलंदाजी करतो.
वेळ व स्वरूप: हा सामना अवघ्या ४५ मिनिटांत संपतो. १२ संघांना प्रत्येकी तीन संघांच्या चार गटांत विभागले गेले असून अव्वल दोन संघ बाद फेरीत (नॉकआऊट) पोहोचतात.
भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारताने यापूर्वी केवळ एकदाच २००५ मध्ये रॉबिन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हाँगकाँग सिक्सेसचे विजेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त १९९२ आणि १९९६ मध्ये भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. गेल्या आवृत्तीत भारताने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता; मात्र पुढील फेऱ्यांमध्ये पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. पाकिस्तान संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरणार आहे.




