‘भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला पण..’; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुणे बंदचा इशारा

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. विवेक भीमनवार यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ ‘इगो’पोटी आणि मैत्रीखातर तो स्वीकारत नसून आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय न झाल्यास ‘पुणे बंद’ची हाक देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनस्थळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “परवा संध्याकाळी विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. वस्तुतः हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवणे अपेक्षित होते; परंतु निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकून त्यांनी ही खेळी खेळली आहे. भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर विरोधक उद्या कोणाचाही राजीनामा मागतील आणि पुढे आपलाही राजीनामा मागितला जाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटते. एका बाजूला मित्राला वाचवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा इगो जपायचा आहे. या इगोच्या खेळात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले असून त्यांची स्वप्ने चिरडली जात आहेत.”
हेही वाचा
१० ऑक्टोबरला ‘जेन झी’चा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘CJP’ आक्रमक!
भीमनवारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच राजीनामा का पाठवला, यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “आपला मित्रच मुख्यमंत्री पदावर बसला आहे हे ठाऊक असल्याने भीमनवारांनी ही राजकीय खेळी खेळली असावी. मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. हा राजीनामा दिला असल्याची खात्रीशीर आतली बातमी आमच्याकडे आहे. आता लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे की मुख्यमंत्र्यांची मैत्री आणि अहंकार, हे देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवायचे आहे.”
कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे बंदचा इशारा
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत असून भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. जर आजच्या कॅबिनेटमध्ये याबाबत योग्य निर्णय झाला नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडत ‘पुणे बंद’ करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.





