न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगाव येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी; ‘स्वच्छता आणि संस्कार’ यावर भर

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय पवार आणि मुख्याध्यापिका विद्या नाईक यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संस्थापक अध्यक्ष विजय पवार यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे महत्त्व विशद केले. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी गांधीजींचे विचार आणि उत्तम संस्कार अंगीकारणे काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
हेही वाचा
गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
मुख्याध्यापिका विद्या नाईक यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेची आठवण करून देत त्यांच्या साध्या राहणीमानाचा व उच्च विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. “परिसर स्वच्छ ठेवणे हीच गांधीजींना खरी आदरांजली ठरेल; त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरासोबतच शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली.
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे विचार हे केवळ इतिहासातील पाने नसून ते आजच्या पिढीसाठी जगण्याचा मार्ग आहेत. आजच्या डिजिटल युगात मुलांवर उत्तम संस्कार होणे आणि त्यांच्यात स्वच्छतेची आवड निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत, हाच या कार्यक्रमामागील आमचा मुख्य उद्देश आहे.
– विजय पवार, संस्थापक अध्यक्ष, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव.





