“जी आग लागायची ती लागली”; राज ठाकरेंकडून मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर ती पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून ही पोस्ट हटवत असल्याचे स्पष्ट करतानाच, “जी आग लागायची ती लागली आहे, जानेवारी २०२६ मध्ये शिवतीर्थावरून पेटवलेला वणवा कायम राहील,” असा आक्रमक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
सबिर भाटिया यांनी तयार केलेली एक डॉक्युमेंट्री राज ठाकरे यांनी २२ ऑक्टोबर रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून पोस्ट केली होती. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध तसेच राजकीय फायद्यावर भाष्य करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या माहितीनुसार, या व्हिडिओला ट्विटरवर ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले, तर फेसबुकवरही प्रचंड प्रतिसाद लाभला. मात्र, या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित डॉक्युमेंट्री शेअर करणाऱ्या खात्यांना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली होती.
पोस्ट डिलीट करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “या डॉक्युमेंट्रीला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांमार्फत मला ही पोस्ट काढण्याची विनंती करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील अत्यंत सक्षम दल असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. म्हणूनच पोलीस प्रमुखांच्या शब्दाचा मान ठेवून मी ही पोस्ट डिलीट करत आहे. मात्र, आमचा लढा थांबणार नाही; जानेवारी २०२६ मधील आमचे मूळ सादरीकरण अजूनही सोशल मीडियावर कायम आहे.”
हेही वाचा
“कदाचित उद्याच हल्ला करू!”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, चर्चेचे दरवाजेही ठेवले खुले
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
— Raj Thackeray (@RajThackeray) October 25, 2026
“माझा विरोध व्यक्तीला नाही, तर एकाधिकारशाहीला”
राज ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, देशाचे प्रबोधन व्हावे हाच त्यांचा उद्देश होता आणि तो पूर्ण झाला आहे. “पंतप्रधानांनी देशातील सर्व उद्योगपतींना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मिती करावी, पण केवळ एकाच उद्योगपतीचे लाड पुरवले जात असतील, तर आमचा त्याला विरोधच राहील,” असे सांगत त्यांनी एकाधिकारशाहीविरोधातील भूमिका मांडली.
भीमाशंकर वनजमिनीवरून सत्ताधाऱ्यांना खडे बोल
या वेळी राज ठाकरे यांनी राज्यातील वनजमिनींच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघात केला. “भीमाशंकर येथील शेकडो हेक्टर वनजमीन गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या घशात घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राची संपत्ती उद्योगपती मित्रांच्या स्वाधीन केली जात असताना राज्यातील खासदार, आमदार आणि मंत्री मूग गिळून गप्प कसे बसू शकतात? सत्तेपुढे लाचार होणे महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.




