TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘व्होट चोरी’विरोधातील आंदोलनावरून राहुल गांधी आक्रमक; दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात ५०० हून अधिक आंदोलक ताब्यात

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशातील विविध भागांत मतदार यादीतील कथित अनियमितता आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांविरोधात आंदोलने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी आंदोलन करणारे युवक शांततेच्या मार्गाने आपला आवाज उठवत असल्याचे म्हटले.

राहुल गांधी म्हणाले की, गांधी जयंतीच्या दिवशी हजारो तरुण ‘व्होट चोरी’विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ते कोणत्याही हिंसेशिवाय आंदोलन करत असून त्यांची मागणी स्पष्ट आहे—मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. आंदोलन करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“बापूंनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढायला शिकवले. काठीने गर्दी रोखता येईल, पण लोकांचे प्रश्न रोखता येणार नाहीत. ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल आणि ज्या व्यवस्थेने त्यांना तिथे बसवले आहे, ती व्यवस्थाही जाईल,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

दिल्लीतील आंदोलनात ५०० हून अधिक जण ताब्यात

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबत आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर आंदोलकांना जंतर-मंतरकडे जाण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेडिंग आणि मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि AISAच्या अध्यक्ष नेहा बोरा यांचाही समावेश होता.

जंतर-मंतर परिसरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेतही बदल करण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आले असून दिल्ली मेट्रोच्या ११ स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

हेही वाचा –  भारतीय महिला हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय; 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण

मुंबईतही CJPचे आंदोलन

दरम्यान, मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. CJPकडून SIR प्रक्रियेला स्थगिती आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे.

देशातील विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनांच्या केंद्रस्थानी मतदार यादीतील बदल, SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतचे प्रश्न आहेत. विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले जात असताना, भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. भाजप नेत्यांनी विरोधकांकडून घटनात्मक संस्थांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानेही यापूर्वी आपल्या निर्णयप्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्तांमधील वेगवेगळी मते ही निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मतदार यादी आणि SIR प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button