सिप्ला फार्माच्या पुण्यातील गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द; FDAची मोठी कारवाई
औषधांच्या पॅकेजिंगवर नियमबाह्य दावे; साठवणूक, नोंदी आणि औषधसाठ्यातही आढळल्या त्रुटी

पुणे : औषधांच्या पॅकेजिंगवरील जाहिराती आणि गोदामातील अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील गोदामाचे घाऊक औषध विक्री परवाने रद्द केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
FDAच्या तपासणीत ‘Reactin Plus’ या औषधाच्या पॅकेजिंगवर डोकेदुखी, स्नायुदुखी, पाठदुखी, सांधेदुखी आणि दातदुखीपासून त्वरित आराम मिळतो, असे दावे आढळले. औषधाच्या बॉक्सवर मानवी आकृतीच्या माध्यमातून स्नायुदुखी कमी होत असल्याचेही दर्शवण्यात आले होते. या दाव्यांबाबत औषधविषयक नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे औषधाच्या लेबलिंगबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले.
औषधांचा साठा थेट जमिनीवर
गोदामातील औषधांच्या साठवणुकीतही अनेक त्रुटी आढळल्या. औषधांचे बॉक्स योग्य रॅक किंवा पॅलेट्सवर ठेवण्याऐवजी थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. औषधांच्या साठ्यावर धूळ साचलेली होती, तसेच गोदामाच्या स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळल्या.
मुदत संपलेल्या औषधांसाठी स्वतंत्र जागा निश्चित केलेली नव्हती. तसेच अशा औषधांवर ‘विक्रीसाठी नाही’ असा स्पष्ट फलकही नव्हता. मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि नोंदी उपलब्ध नसल्याचेही FDAच्या तपासणीत समोर आले.
याशिवाय तपासणीसाठी आवश्यक असलेले फॉर्म ३५ पुस्तक उपलब्ध नसणे, खरेदी-विक्रीच्या पावत्यांमध्ये त्रुटी असणे, अशा बाबीही आढळल्या.
हेही वाचा – ‘लाठ्या-काठ्या हाणा, तुरुंगात टाका; आंदोलन सुरूच राहणार’; शिवाजी पार्कवर CJPचा एल्गार
संगणकीय नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत
गोदामातील संगणकीय नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध औषधसाठा यामध्येही तफावत आढळली. या तफावतीमध्ये प्रतिजैविक औषधांचाही समावेश होता. केवळ संगणकीय प्रणालीमध्ये औषधांच्या नोंदी केल्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष साठा, साठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांबाबतच्या कायदेशीर जबाबदारीतून कंपनीला सूट मिळू शकत नाही, असे FDAने स्पष्ट केले.
औषधांची विक्री करणाऱ्या कंपनीवर औषधांच्या पॅकेजिंगपासून ते बाजारातील विक्री-वितरणापर्यंत संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या असतात. केवळ उत्पादकाची जबाबदारी असल्याचे सांगून मार्केटरला स्वतःची जबाबदारी टाळता येणार नाही, असेही परवाना प्राधिकरणाने नमूद केले.
कंपनीला सुनावणीची संधी
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापूर्वीची कारवाई मागे घेऊन नव्याने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. FDAने ४ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीला सुधारित कारणे दाखवा नोटीस बजावली. कंपनीने ११ सप्टेंबर रोजी लेखी उत्तर दिले, तर २१ सप्टेंबर रोजी कंपनीला वैयक्तिक सुनावणीची संधी देण्यात आली.
कंपनीचे लेखी उत्तर, सुनावणीदरम्यान मांडलेली बाजू, तपासणीतील निष्कर्ष आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार केल्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी घाऊक औषध विक्री परवाने रद्द करण्याचा आदेश देण्यात आला.
औषधांची गुणवत्ता व सुरक्षितता राखणे, योग्य साठवणूक सुनिश्चित करणे आणि औषधांच्या विक्री-वितरणातील नियमांचे काटेकोर पालन करून घेण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरूच राहील, असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.




