‘लाठ्या-काठ्या हाणा, तुरुंगात टाका; आंदोलन सुरूच राहणार’; शिवाजी पार्कवर CJPचा एल्गार
अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत (SIR) प्रश्न उपस्थित करत CJPने आंदोलनाची हाक दिली होती.
आंदोलनादरम्यान एका युवतीने, “पहिल्या आंदोलनातून धडा घेतला आहे. त्यामुळे आज सगळेजण तयारीनिशी आंदोलनात आले आहेत. तुम्ही लाठ्या-काठ्या हाणा किंवा तुरुंगात टाका, आमचे आंदोलन सुरूच राहणार,” अशी भूमिका मांडली.
यानंतर अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “तुम्ही ऐकताय ना, हे ऐका. आंदोलन केले तर तुम्ही आम्हाला तीन दिवस तुरुंगात टाकणार होता. आम्हाला तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका,” असे आव्हान त्यांनी दिले.
“तुम्हाला काय हे आमदार वाटले का, धमकी दिली की पळत तुमच्याकडे येतील? तुमची खुर्ची म्हणजे फेव्हीकॉलने चिकटवलेला एक-एक पाय आहे. त्यामुळे कधी तुमची खुर्ची पडेल सांगता येत नाही,” असे दिपके म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या परंपरेचा उल्लेख करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
“आम्हाला तीन दिवस नाही, तर तीन महिने जेलमध्ये ठेवा. जेलमधून बाहेर आल्यानंतरही मी तीच गोष्ट म्हणेन, ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’,” असे दिपके यांनी म्हटले.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी फडणवीसांनी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ न्यावे; रामदास आठवले यांची मागणी
‘ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी’
CJPच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “गांधी… गांधी…”, “वंदे मातरम्…” आणि “इस्तीफा दो…” अशा घोषणा दिल्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. CJPने SIR प्रक्रिया थांबवावी, मतदार यादीबाबत चौकशी करावी आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात बदल करण्याच्या मागण्याही मांडल्या आहेत.
या आंदोलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा CJPकडून करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि पर्यायी ठिकाण म्हणून आझाद मैदान सुचवले होते. मात्र, CJPने शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला.
सेलिब्रिटींचीही उपस्थिती
CJPच्या आंदोलनाला अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि गायक-संगीतकार विशाल ददलानी यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. नसीरुद्दीन शाह यांनी अभिजीत दिपके यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या आंदोलनामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या चर्चेला मुंबईत आणखी सार्वजनिक व्यासपीठ मिळाले.
दरम्यान, आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, CJPने त्या वृत्तांना फेक न्यूज म्हटले आणि दिपके यांनी स्वतःचा सेल्फी पोस्ट करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.





