पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ भाजप लढवणार; धनंजय महाडिक यांचा दावा
पुणे पदवीधर जागेवर भाजपचा दावा; गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. मात्र, राष्ट्रवादीचे लाड यांचे संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये आले आहे. त्यामुळे या जागेवर भारतीय जनता पक्षाचा दावा असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही मतदारसंघांत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय महाडिक म्हणाले, “शिक्षक मतदारसंघाची मागील निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी झाली होती. काँग्रेसचा विजय झाला असला, तरी यावेळी शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष म्हणून लढवण्याचा आमच्या वरिष्ठांचा निर्णय आहे.”
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीबाबतही महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढविण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पातळीवर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे ठराव गोळा केले आहेत. प्रत्येक पक्षाकडे किती ठराव आहेत आणि संबंधित पक्षाच्या किती संस्था आहेत, याची पडताळणी करून त्यानुसार जागावाटप करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या ठरावांच्या संख्येच्या आधारे दहा जागांची मागणी केली आहे. भाजपकडून आठ, शिवसेनेकडून आठ, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. एकूण २५ जागा असताना घटक पक्षांच्या मागण्या २९ जागांपर्यंत पोहोचल्याने अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी फडणवीसांनी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ न्यावे; रामदास आठवले यांची मागणी
महाडिक यांनी सांगितले की, महायुतीतील नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपापली भूमिका मांडली आहे. प्रत्येक पक्षाला अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. सर्वांच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री दोन-तीन दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेतील, असे सांगण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच महायुतीतील चारही पक्षांचे प्रमुख आहेत. ते जो निर्णय देतील, तो आम्ही सर्वजण मान्य करू. ज्या जागा दिल्या जातील, त्या जागा घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय अंतिम असेल,” असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
गोकुळमध्ये महायुती म्हणून एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २५ वर्षे गोकुळमध्ये सत्ता होती. त्या काळात निवडणुका पक्षीय पातळीवर न लढवता विविध गटांच्या माध्यमातून लढवल्या जात होत्या. मात्र, मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना मुंबईत बोलावून महाविकास आघाडीचे पॅनल तयार केले होते. त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला अधिक महत्त्व आले. आता महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे महाडिक यांनी सांगितले.





