व्हीजेएनटी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष नियोजन; अतुल सावे यांचे निर्देश
चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी; क्रीडा, पर्यावरण आणि सामाजिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.
राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील मान्यताप्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ओबीसी विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालिका सोनाली मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिष्यवृत्ती, ऑलिम्पियाडसाठी विशेष तयारी
चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांसोबतच ऑलिम्पियाड परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करावे, अशा सूचना सावे यांनी दिल्या. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्यासाठी नियमित सराव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
आश्रमशाळांमध्ये विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्रीडा साहित्याचा विद्यार्थ्यांनी योग्य आणि पूर्ण वापर करावा, याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असेही निर्देश देण्यात आले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज सावे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – रानभाज्या आणि भरडधान्यांत आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान; जल-जंगल-जमिनीच्या संवर्धनावर डॉ. अशोक वुईकेंचा भर
पर्यावरणपूरक उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक उपक्रमांवर भर न देता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमही नियमितपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम आयोजित करावेत, असे मंत्री सावे यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विकासाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर विभागाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





