धान-भरडधान्य खरेदीची प्रलंबित देयके तातडीने द्या; छगन भुजबळांचे निर्देश
राज्यात एमएसपीअंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागीची खरेदी; पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हमीभावाची रक्कम वेळेत जमा करण्याचे आदेश

मुंबई : किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
पणन हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एमएसपीअंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार धानाची १ कोटी ३ लाख ८० हजार १९६.७० क्विंटल, ज्वारीची ५५ हजार १८३.७० क्विंटल, मक्याची १० लाख ५ हजार १११ क्विंटल, बाजरीची ५१०.५० क्विंटल आणि रागीची ४ हजार ६२४ क्विंटल खरेदी झाली आहे.
रब्बी पणन हंगामातील खरेदीमध्ये धान, ज्वारी आणि मक्याचा समावेश असून उपलब्ध नोंदीनुसार एकूण १ कोटी ८ लाख २१ हजार ४०४.६० क्विंटल खरेदी झाल्याचे नमूद आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत अदा करण्यात आलेली रक्कम तसेच अद्याप देय असलेल्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहिती संकलित करण्यात आली आहे.
हेही वाचा – व्हीजेएनटी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष नियोजन; अतुल सावे यांचे निर्देश
प्रलंबित देयके प्राधान्याने अदा करण्याचे आदेश
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित धान आणि भरडधान्याची हमीभावाची रक्कम मिळण्यासाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी प्रलंबित देयकांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
एमएसपी योजनेंतर्गत खरेदी प्रक्रियेत सहभागी सर्व यंत्रणांनी उपलब्ध निधी, प्रलंबित देयके आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीचा तातडीने आढावा घ्यावा. शेतकऱ्यांची देयके प्राधान्याने अदा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
“शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमीभावाची रक्कम वेळेत मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रलंबित देयकांच्या बाबतीत कोणताही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही,” असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.





