Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रानभाज्या आणि भरडधान्यांत आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान; जल-जंगल-जमिनीच्या संवर्धनावर डॉ. अशोक वुईकेंचा भर

बारीपाड्यात ‘वनभाजी स्पर्धा व मिलेट महोत्सव 2026’; 73 गावांतील 600 महिलांचा वनभाजी स्पर्धेत सहभाग, स्थानिक उत्पादनांच्या मूल्यवर्धनासाठी 5 कोटींच्या प्रकल्पाची शक्यता

धुळे : रानभाज्या म्हणजे केवळ जंगलातून मिळणारा आहार नसून आदिवासी समाजाने पिढ्यान्‌पिढ्या जपलेले पारंपरिक ज्ञान, निसर्गाशी असलेले नाते आणि आरोग्यदायी जीवनपद्धतीचा अमूल्य ठेवा आहे. हे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे आयोजित ‘वनभाजी स्पर्धा व मिलेट महोत्सव 2026’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे गिरीश कुबेर, मैत्रबोध परिवाराचे श्रीमित्र जीवजी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील तसेच महोत्सवाचे आयोजक पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. वुईके म्हणाले की, रानभाज्या आणि मिलेट्स अर्थात भरडधान्यांना आज जगभरात नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यदायी अन्नपद्धतीकडे जग पुन्हा वळत असताना आदिवासी समाजाकडे हे ज्ञान पूर्वापार आहे. कोणत्या ऋतूत कोणती रानभाजी मिळते, कोणत्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग होतो, याचे मौलिक ज्ञान आदिवासी समाजातील वयोवृद्ध, महिला आणि वैदू यांनी अनुभवातून जपले आहे.

आदिवासी समाजाची जीवनशैली देव-दैवत, अस्मिता आणि निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. निसर्गाकडून मिळणाऱ्या साधनसंपत्तीची परतफेड निसर्गसंवर्धनातून झाली पाहिजे. जल, जमीन आणि जंगल टिकले तरच संस्कृती, जीवनपद्धती आणि पारंपरिक ज्ञान टिकून राहील, असेही त्यांनी सांगितले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा उल्लेख करत डॉ. वुईके यांनी आदिवासी समाजाच्या निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यावर भर दिला. संस्कृती केवळ उत्सवांपुरती मर्यादित न ठेवता तिच्यामागील मूल्ये आणि ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेद, वनौषधी आणि नैसर्गिक उपचारपद्धती या आदिवासी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारीपाड्याला देशपातळीवर ओळख

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, बारीपाड्यातील वनभाजी महोत्सवाविषयी अनेक वर्षांपासून ऐकत होतो. प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. बारीपाड्याचा वनभाजी महोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याने देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्याचा गौरव करताना रावल म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनातून लोकसहभागावर आधारित ग्रामविकास कसा साधता येतो, हे बारीपाड्याने देशाला दाखवून दिले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि कोद्रा यांसारख्या भरडधान्यांचे संवर्धन, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि विपणन करण्याची मोठी संधी या भागात आहे. महिला बचत गटांना या प्रक्रियेशी जोडल्यास स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळू शकते.

बारीपाड्याचा हा उपक्रम जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी, महिला बचत गट आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील वर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पणन विभागाच्या ‘महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क’ (MAGNET) प्रकल्पाच्या माध्यमातून बारीपाडा आणि परिसरातील भरडधान्ये व स्थानिक उत्पादनांच्या प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडणीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची शक्यता तपासली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार एक मोठा प्रकल्प किंवा प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प उभारण्याचाही पर्याय विचारात घेतला जाईल, असे रावल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  India vs West Indies 2nd ODI: भारताचा विक्रमी विजय! ४०६ धावांचा यशस्वी पाठलाग; गिलचे द्विशतक, रोहितचे शतक

21 वर्षांपासून वनभाजी महोत्सवाची परंपरा

पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितले की, बारीपाड्यात गेल्या 21 वर्षांपासून वनभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. जैवविविधतेचा अमूल्य ठेवा समाजासमोर आणणे आणि पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यंदा जवळपास 73 गावांतील 600 महिलांनी वनभाजी स्पर्धेसाठी नोंदणी केली, तर मिलेट उपक्रमात 17 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. विविध उपक्रमांमध्ये सुमारे 750 महिलांचा सहभाग नोंदविण्यात आला असून जवळपास 90 टक्के सहभाग महिलांचा आहे.

जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या पाच घटकांवर शासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास शाश्वत विकासाचा भक्कम पाया उभारता येईल. सामुदायिक वनहक्क, जैवविविधता आणि पेसा कायद्याचा प्रभावी वापर करून स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न सोडविता येऊ शकतात. पर्यावरण शिक्षणाशी या उपक्रमाची सांगड घालून शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

वनभाजी स्पर्धेतील विजेते

वनभाजी वैयक्तिक स्पर्धेत ताराबाई कांबडे यांनी 237 भाज्यांसह प्रथम क्रमांक मिळविला. राधिकाबाई चौरे यांनी 214 भाज्यांसह द्वितीय, नीता चौरे यांनी 170 भाज्यांसह तृतीय, विमल पवार यांनी 80 भाज्यांसह चतुर्थ, तर संगीता गांगुर्डे यांनी 50 भाज्यांसह पाचवा क्रमांक पटकाविला.

मिलेट स्पर्धेतील विजेते

मिलेट स्पर्धेत नंदनवन महिला बचत गटाने नागलीचे 105 प्रकार सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. देवमोगरा महिला बचत गटाने सावा या भरडधान्याचे 75 प्रकार सादर करून द्वितीय, तर वैष्णवी महिला बचत गटाने राजगिऱ्याचे 60 प्रकार सादर करून तृतीय क्रमांक मिळविला.

पारंपरिक भात स्पर्धेतील विजेते

पारंपरिक भाताच्या प्रकारांच्या स्पर्धेत सागर महिला बचत गटाने चिम साळ तांदळाचे 70 प्रकार सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. साई महिला बचत गटाने काळ्या भाताचे 66 प्रकार सादर करून द्वितीय, तर भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाने पांढऱ्या भवाड्या भाताचे 57 प्रकार सादर करून तृतीय क्रमांक पटकाविला.

बारीपाड्यातील या महोत्सवाने रानभाज्यांच्या स्पर्धेपलीकडे जाऊन जैवविविधता, आदिवासी खाद्यसंस्कृती, महिलांचे पारंपरिक ज्ञान, भरडधान्ये आणि लोकसहभागावर आधारित शाश्वत विकासाचा संदेश दिला. स्थानिक उत्पादनांना मूल्यवर्धन आणि बाजारपेठेची जोड देत निसर्गसंवर्धनाला चालना दिल्यास आदिवासी भागातील विकासाला नवी दिशा मिळू शकते, हे या महोत्सवातून अधोरेखित झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button