TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘नम्रता शिरोडकरांसमोर काम करताना खूप घाबरलो होतो’; जितेंद्र जोशींनी सांगितला अनुभव

‘प्राण जाये पर शान ना जाये’च्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा; ‘त्या जिथे कुठे असतील, त्यांना मनापासून प्रणाम’

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आपल्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मराठी सिनेमा आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव जितेंद्र जोशी यांनी नुकताच शेअर केला.

जितेंद्र जोशी यांनी ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या चित्रपटात नम्रता शिरोडकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. महेश मांजरेकर यांच्या माध्यमातून आपल्याला ही संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अमोल परचुरे यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या काळातील शूटिंगच्या आठवणी आणि नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला.

‘नम्रता शिरोडकरांसमोर काम करताना खूप घाबरलो होतो’

जितेंद्र जोशी म्हणाले की, नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम केले तेव्हा आपले वय खूप कमी होते. त्यांच्यासमोर काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होता, पण त्याचवेळी मनात मोठे दडपणही होते.

“मी नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर काम केलं तेव्हा अगदी भाबडं वय होतं. नम्रता शिरोडकर यांच्या समोर आपण काम करतोय हे खूप चांगलं वाटलं होतं, पण त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. त्यानंतर माझी आणि नम्रता शिरोडकर यांची परत कधीच भेट झाली नाही. पण त्या जिथे कुठे असतील, मी त्यांना मनापासून प्रणाम करतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “वाचनातून जीवनाचा शोध” संकल्पनेवर ग्रंथालय सप्ताह व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह उत्साहात संपन्न

महेश मांजरेकरांनी दिली होती संधी

जितेंद्र जोशी यांनी या चित्रपटाची संधी कशी मिळाली, याचाही किस्सा सांगितला. त्यावेळी ते ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक करत होते. हे नाटक पाहण्यासाठी महेश मांजरेकर आले होते.

“ते मला म्हणाले, ‘अरे, मी तुला नम्रता शिरोडकरच्या बरोबर पिक्चर देतो.’ त्यावेळी मला असं वाटलं की, हे काय चाललंय आपल्या आयुष्यात,” असे जितेंद्र जोशी यांनी सांगितले.

नम्रता शिरोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना त्यांनी त्या केवळ सौंदर्यानेच नव्हे तर मनानेही सुंदर असल्याचे म्हटले.

‘मोठा स्टार समोर असताना एक वेगळंच दडपण असतं’

शूटिंगच्या आठवणी सांगताना जितेंद्र जोशी म्हणाले की, आपल्या समोर मोठा स्टार असताना त्याचे एक वेगळे दडपण असते. मात्र, त्या काळात स्टार कलाकार आपल्यासोबत कसे वागतात, याच्या आठवणी कायम लक्षात राहतात.

“इतका मोठा स्टार आपल्यासमोर आहे, याचं त्यावेळी एक वेगळंच दडपण असतं. त्यावेळी ते स्टार आपल्याबरोबर कसं वागतात, ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जितेंद्र जोशी नुकतेच ‘दायरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button