TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ज्या उत्पादनाची जाहिरात करता, आधी स्वतः वापरून पाहा’; तुकाराम मुंढेंचा जाहिरातदारांना थेट सवाल

‘चापलुसी, दुटप्पीपणा आणि दुतोंडी वागणं मला अजिबात आवडत नाही’; पान-गुटख्याच्या जाहिरातींच्या माध्यमातून तुकाराम मुंढेंनी उपस्थित केला नैतिकतेचा मुद्दा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहिरातींमधून उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना थेट सवाल केला आहे. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना त्याच्या गुणवत्तेवर आणि परिणामांवर विश्वास असेल, तर जाहिरात करणाऱ्या व्यक्तीने ते उत्पादन स्वतः वापरून पाहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी दुटप्पीपणा आणि चापलुसीवरही स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

“मला दुटप्पी लोकांचा खूप त्रास होतो. मला चापलुसी अजिबात आवडत नाही. तुम्ही जे काम करता, जे बोलता आणि जसे वागता, त्याबद्दल जर तुम्ही स्वतः प्रामाणिक नसाल, तर तुम्ही खरे माणूस नाही,” असे मुंढे म्हणाले.

एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना केवळ इतरांना त्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यापेक्षा सुरुवात स्वतःपासून करावी, असेही त्यांनी सांगितले. “तुम्ही ज्या गोष्टीची जाहिरात करत आहात ती जर खरोखरच चांगली असेल, तर आधी स्वतःपासून त्याची सुरुवात करा. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीने ते उत्पादन स्वतःही वापरून पाहिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या’; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येवर आदित्य ठाकरेंचा संताप

पान आणि गुटख्याच्या जाहिरातींचा संदर्भ देत मुंढे यांनी जाहिरातदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. “जर तुम्ही पान-गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी स्वतः खाऊन बघा, मग तुमच्या मुलांना खायला द्या आणि त्यांनाही याची सवय लावा,” असे ते म्हणाले. जाहिरातींमध्ये उत्पादनातील विशिष्ट घटकांचा उल्लेख करून ग्राहकांना आकर्षित केले जाते, मात्र अशा उत्पादनांच्या सेवनाबाबत जाहिरातदारांनी स्वतःची भूमिका तपासावी, असे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून दिशाभूल करणाऱ्या किंवा प्रतिबंधित स्वरूपाच्या जाहिराती करणे हा केवळ नैतिकतेचा प्रश्न नसून कायदेशीर बाबही आहे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. “नियमांचं उल्लंघन करून अशा जाहिराती करणं हे केवळ अनैतिकच नाही, तर पूर्णपणे बेकायदेशीरसुद्धा आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुंढे यांच्या या वक्तव्यामुळे खाद्यपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button