पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळ्यातही सोसायट्यांना टँकरचा आधार!
पाणीपुरवठ्यावर 'श्वेतपत्रिका' आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा महापालिकेला अल्टिमेटम
आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबरला शांततापूर्ण आंदोलन
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसाचा हंगाम सुरू असतानाही शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना अपुऱ्या, अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ (पीसीसीएचएसएफ) याविरोधात आक्रमक झाला आहे. महासंघाने महापालिका प्रशासनाकडे आठ तातडीच्या मागण्या केल्या असून, आठवडाभरात ठोस कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यानंतरच्या तारखेला शांततापूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.महासंघाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्त, महापौर, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, नगरसेवक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना निवेदन पाठवले. हे पत्र २२ सप्टेंबर रोजी आयुक्त कक्षात स्वीकारण्यात आले.
“धरण भरलेले, तरी सोसायट्या तहानलेल्या”
पवना धरणातून सुमारे तीन आठवड्यांपूर्वी अतिरिक्त पाणी सोडण्यात आले, याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे. धरणात मुबलक पाणी असूनही गृहनिर्माण सोसायट्यांना गरजेनुसार नियमित आणि पुरेसा पुरवठा होत नाही, हा मूलभूत प्रश्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या पाणी वाढलेले असताना नागरिकांना टँकरसाठी जादा पैसे मोजावे लागणे हे महापालिकेच्या जलव्यवस्थापनाचे गंभीर अपयश असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. यामुळे हजारो कुटुंबांवर आर्थिक आणि मानसिक ताण येत आहे.
बांधकाम परवानग्यांवर प्रश्नचिन्ह
नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना पाणीपुरवठ्याच्या क्षमतेचा स्वतंत्र व सार्वजनिक आढावा का घेतला जात नाही, असा थेट सवाल महासंघाने उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा, टँकर आणि बांधकाम परवानग्या यांच्या निर्णय प्रक्रियेत हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of Interest) होणार नाही, याची खात्री देणारी यंत्रणा कोणती, अशीही विचारणा आहे. सोसायट्यांना कृत्रिमरीत्या कमी पाणी देऊन टँकरवर अवलंबून ठेवले जात आहे का, अशी नागरिकांमध्ये शंका असून पाणी कपात, टँकरची वाढती मागणी आणि पुरवठादार यांच्यात काही अनुचित संबंध (नेक्सस) आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा
सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
महासंघाच्या प्रमुख मागण्या
- सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचा झोननिहाय पाणीपुरवठा, दाब, वेळापत्रक आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या पाण्याचे तातडीने सर्वेक्षण करावे.
- पवना धरणातील साठा, उचल, वितरण आणि शहरातील प्रत्यक्ष वापराचे पारदर्शक आकडे जाहीर करावेत.
- पाणी उपलब्ध असूनही पुरवठा अपुरा का, याची तांत्रिक चौकशी करून अहवाल जाहीर करावा.
- नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना पाणीपुरवठा क्षमतेचा स्वतंत्र आढावा अनिवार्य करावा.
- पाणीपुरवठा, टँकर आणि बांधकाम परवानग्यांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारावी.
- सोसायट्यांना अनावश्यक टँकरवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी तातडीची आपत्कालीन जलवितरण योजना लागू करावी.
- टँकरची गरज निर्माण करणाऱ्या परिस्थितीचे स्वतंत्र ऑडिट करावे आणि गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी.
- प्रत्येक प्रभागासाठी जबाबदार अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सार्वजनिक करावे.
साठवणुकीचा नवा भुर्दंड
एक दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे अनेक सोसायट्यांना दोन दिवसांचे पाणी साठवावे लागते. त्यासाठी अधिकच्या टाक्या बांधण्याची नवी अडचण निर्माण झाली असून त्याचा खर्च लाखोंमध्ये जात आहे. “याला जबाबदार कोण?” असा प्रश्न महासंघाने विचारला आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या वाकड, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, शनी मंदिर रोड, पिंपळे सौदागर परिसरातील ३४ सोसायट्यांची यादी निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. त्यात श्री गणेश इम्पेरिया, कोहिनूर कोर्टयार्ड, पाम स्प्रिंग, कॅप्रिचिओ, भगवती रॉयल, एडन गार्डन, वेस्टर्न अव्हेन्यू, नंदन इन्स्पेरा, एमराल्ड पार्क, लेगसी अर्बानिया आदींचा समावेश आहे. थकीत करदात्यांना स्मरणपत्रे पाठवण्यात महापालिका प्रशासन अत्यंत सक्रिय असते. नागरिकांनी भरलेल्या करातून मिळणारी मूलभूत सुविधा नियमित आणि पुरेशी देण्यातही तितकीच तत्परता अपेक्षित असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.
“आम्हाला प्रशासनाशी संघर्ष नको, तोडगा हवा आहे. धरण भरलेले असताना आणि पाऊस कोसळत असताना सोसायट्यांना टँकर मागवावे लागत असतील, तर ते नियोजनाचे अपयश आहे. नागरिक वेळेवर कर भरतात; त्या बदल्यात नियमित आणि पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आठवडाभरात प्रशासनाने बैठक घेऊन कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा २ ऑक्टोबरला शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय राहणार नाही.”
– सचिन लोंढे, अध्यक्ष, पीसीसीएचएसएफ.




