प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे अग्निसुरक्षा प्रशिक्षण व मॉक ड्रील संपन्न
शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मोशी | शाळेतील अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष अग्निसुरक्षा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सरावाचे (Mock Drill) आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपत्कालीन सज्जतेचे धडे घेतले.
‘सॅप इंजिनिअर्स’चे (SAP Engineers) प्रतिनिधी राहुल शिरसाट यांनी उपस्थितांना अग्निशामक यंत्रणेबाबत सविस्तर प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी त्यांनी आगीचे विविध प्रकार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर, त्याची कार्यपद्धती आणि संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक, कर्मचारी, कार्यालयीन मदतनीस (मावशी) तसेच सुरक्षा पथकातील सदस्यांना विशेष प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात आले.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळ्यातही सोसायट्यांना टँकरचा आधार!
प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारची अग्निशामक यंत्रे, फायर होज पाईपचा वापर आणि शाळेतील अंतर्गत अग्निसुरक्षा प्रणाली कशी कार्यान्वित करावी, याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्वतः ही यंत्रे हाताळून आग विझवण्याचे कौशल्य आत्मसात केले.
शाळा प्रशासनाने राहुल शिरसाट आणि ‘सॅप इंजिनिअर्स’ यांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी शाळेत अधिक सुरक्षित वातावरण तयार होण्यास मोठी मदत होत असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले.





