TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्याच्या शेतात अधिकाऱ्यांनी बांधला खास रॅम्प; बावनकुळेंनी व्यक्त केली नाराजी

नांदेडच्या अर्धापूरमध्ये सोयाबीन पिकाची पाहणी; शेतकऱ्याला न विचारता रस्ता तयार केल्याने महसूलमंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना

नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शिवारात पीक नुकसानीची पाहणी केली. विमलबाई साखरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी मंत्री येणार असल्याने अधिकाऱ्यांनी शेतात जाण्यासाठी तात्पुरता खडीचा रस्ता आणि रॅम्प तयार केला होता. मात्र, या रस्त्याची माहिती मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

शेतात जाण्यासाठी काही ठिकाणी उडी मारून जावे लागत होते. त्यामुळे मंत्री येणार असल्याने अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची परवानगी न घेता खडी टाकून तात्पुरता मार्ग तयार केल्याचे सांगण्यात आले. मात्र, बावनकुळे यांनी या मार्गाचा वापर न करता दुसऱ्या ठिकाणाहून शेतात प्रवेश केला.

यावेळी पत्रकारांनी शेतकऱ्याच्या परस्पर रस्ता तयार केल्याबाबत विचारले असता, ‘शेतकरी बांधावरून उड्या मारून शेतात जातात. मंत्री आल्यावर अशा पद्धतीने रस्ता तयार करणे मला मान्य नाही,’ अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली. शेतकऱ्यालाही त्याच्या परवानगीशिवाय हा रस्ता तयार करण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा –  सामाजिक कार्याची दखल । अनिरुद्ध काळोखे-पाटील यांना ‘मावळ गौरव भूषण’ पुरस्कार!

‘शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू’

पीक नुकसानीची पाहणी करताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील मदतीबाबत बावनकुळे यांनी सोमवारी स्पष्ट केले की, संपूर्ण आणि अचूक पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच पिकानुसार मदतीचे निकष निश्चित केले जातील. पंचनामे पूर्ण होण्यापूर्वी मदत जाहीर केल्यास प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अचूक पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त उपस्थितीत पाहणी करण्याची भूमिका सरकारने यापूर्वी मांडली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button