TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Gyanesh Kumar: ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

SIR आणि Form-6 वरील कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल

ठाणे : एसआयआर (SIR) आणि नवमतदार नोंदणीच्या Form-6 मधील बदलांवरून निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कारभारावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात आंदोलन केले. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

Indian Expressच्या 23 सप्टेंबरच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगातील काही निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमध्ये Form-6 मधील बदल, मतदार यादीतील नावांची नोंद-वगळणे आणि निवडणूक डेटाबेसच्या नियंत्रणासह विविध मुद्द्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळत SIRसह आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कथित अंतर्गत मतभेदांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हेही वाचा –  शेतकऱ्याच्या शेतात अधिकाऱ्यांनी बांधला खास रॅम्प; बावनकुळेंनी व्यक्त केली नाराजी

ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयापासून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी ज्ञानेश कुमार यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. गाढवाच्या गळ्यात निषेधाचा फलक लावण्यात आला होता.

तर सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तींना घोड्यावर बसवण्यात आले. लोकशाहीच्या रक्षणासाठी भूमिका घेतल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी त्यांचा पुष्पहार घालून गौरव केला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तसेच SIR प्रक्रियेविरोधात घोषणाबाजी केली. ‘ज्ञानेश हटाव, निवडणूक आयोग बचाव’, ‘SIR हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, Form-6 आणि SIRवरील कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी Form-6 फाडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निषेध नोंदवला होता.

या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर आणि SIRच्या अंमलबजावणीवरून राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे. आयोगाने मात्र अंतिम निर्णय सर्व सदस्यांच्या मंजुरीने झाल्याची भूमिका कायम ठेवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button