‘बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ’ म्हणताच ट्रोलिंग; जान्हवी किल्लेकरने दिलं दोन शब्दांत उत्तर
‘सायको रंगा’च्या शूटिंगदरम्यान कोल्हापुरात घेतली बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ; ट्रोलर्सच्या कमेंटवर अभिनेत्रीचा बेधडक रिप्लाय

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान तिने कोल्हापुरातील शूटिंगचा एक अनुभव सांगितला आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली.
जान्हवीने सांगितले की, तिची त्वचा संवेदनशील असल्यामुळे बाहेरच्या ठिकाणी गेल्यावर तिला त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोल्हापुरात शूटिंगदरम्यान तिने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ केल्याचे तिने सांगितले.
जान्हवी म्हणाली की, कोल्हापुरात शूटिंग ठरल्याचे कळल्यानंतर तिला सुरुवातीला थोडे टेन्शन आले होते. मुंबईच्या पाण्याची सवय असल्याने कोल्हापुरातील पाणी आपल्याला सूट होईल का, अशी चिंता होती. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने ती बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ करत असल्याचे तिने सांगितले. कोल्हापुराचे पाणी चांगले आहे, मात्र आपली त्वचा संवेदनशील असल्याने ही खबरदारी घेतल्याचेही तिने स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘मतचोरीचा जप करता, पण मेंदूच चोरीला गेलाय’; राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
ट्रोलर्सना जान्हवीचं दोन शब्दांत उत्तर
जान्हवीच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी तिच्यावर टीका केली. ‘मुंबईचे पाणी कोल्हापूरच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे का?’ असा सवाल काहींनी केला, तर काहींनी तिच्या वक्तव्यावरून विनोदी कमेंट्सही केल्या.
ट्रोलिंग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर जान्हवीने आपल्या नेहमीच्या बेधडक अंदाजात ट्रोलर्सना उत्तर दिले. तिने कमेंट करत केवळ ‘ट्रोलर्स वेलकम’ एवढेच लिहिले.
जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावरील ट्रोलिंगला याआधीही बिनधास्तपणे उत्तर देताना दिसली आहे. त्यामुळे तिची ही कमेंटही चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, ‘सायको रंगा’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवी किल्लेकरसोबत स्मिता गोंदकर, सुबोध भावे, पुष्कर जोग आणि मिलिंद शिंदे यांसारखे कलाकार दिसणार आहेत.





