दुष्काळानंतर आता एल निनोचे संकट? फडणवीस म्हणाले, ‘परिस्थितीसाठी तयार राहावं लागेल’
एल निनो फेब्रुवारीत शिगेला पोहोचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज; प्रभाव वाढल्यास निर्माण होणाऱ्या अडचणींसाठी सरकार सज्ज राहणार

नागपूर : महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्यानंतर आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षीही एल निनोचा प्रभाव राहण्याच्या शक्यतेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सरकारला तयारीत राहावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपुरात रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी एल निनोच्या स्थितीवर भाष्य केले. सध्या असलेला एल निनो अद्याप शिगेला पोहोचायचा आहे. तज्ज्ञांच्या मते तो फेब्रुवारीमध्ये उच्च पातळीवर पोहोचू शकतो आणि त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
‘पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे एल निनो तयार होतो. पुढील काळात त्यात बदल होऊन त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याला सर्व प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. एल निनोचा प्रभाव वाढला तर त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींसाठीही तयार राहावे लागेल,’ असे फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा – ‘बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ’ म्हणताच ट्रोलिंग; जान्हवी किल्लेकरने दिलं दोन शब्दांत उत्तर
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. ही घोषणा ‘ट्रिगर-१’ अंतर्गत करण्यात आली असून, ती राज्यातील सुमारे ७४ टक्के तालुक्यांना लागू होते. दुष्काळग्रस्त भागांसाठी जमीन महसुलात सवलत, पीककर्ज पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कात सूट आणि पाणीटंचाईच्या काळात टँकरची व्यवस्था अशा उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भागांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पंचनाम्यावेळी पिकांच्या स्थितीची छायाचित्रे आणि GPS माहिती नोंदवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
गडचिरोलीतील पूरस्थितीवरही फडणवीसांचे भाष्य
दरम्यान, छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याबाबतही फडणवीस यांनी माहिती दिली. प्रशासन सातत्याने संपर्कात असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी अडचण निर्माण झाल्यानंतर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. पूरपाण्याची पातळी कमी होऊन परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात एका बाजूला दुष्काळामुळे पाणी आणि शेतीसमोरील आव्हाने वाढली असताना, दुसरीकडे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हवामानातील बदलांनुसार प्रशासनाला दोन्ही प्रकारच्या परिस्थितींसाठी नियोजन करावे लागणार आहे.





