TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या फडणवीसांना 17 मागण्या; ‘दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा’

तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी; कर्जमाफी, वीजबिल माफी, हेक्टरी 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25 हजारांच्या मदतीची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्य सरकारकडे 17 प्रमुख मागण्या केल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

महाराष्ट्र सरकारने सध्या 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी निकषांत बसणाऱ्या आणि अद्याप दुष्काळी यादीत समाविष्ट न झालेल्या तालुक्यांचाही तातडीने विचार करावा, अशी मागणी केली आहे.

दसरा-दिवाळीपूर्वी थेट आर्थिक मदतीची मागणी

शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना दसरा-दिवाळीपूर्वी मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या पत्रातील मागण्यांनुसार बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1 लाख रुपये, तर शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपये थेट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कर्जमाफीपासून वीजबिल माफीपर्यंत मागण्या

पवार यांनी शेती आणि शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका आणि पतसंस्थांची कर्जे माफ करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच फळबाग कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज तसेच संबंधित वैयक्तिक कर्जांबाबतही मदतीची मागणी केली आहे.

दुष्काळग्रस्त भागातील जमीन महसूल पूर्णपणे माफ करावा आणि कृषी पंपांची थकबाकीसह वीजबिले माफ करावीत, अशी मागणीही पवारांनी केली आहे.

हेही वाचा –  केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये आंदोलन

विद्यार्थ्यांच्या फीपासून टँकरच्या अधिकारांपर्यंत

दुष्काळग्रस्त भागातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह आणि मेस फी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेचे नियम शिथिल करून मागेल त्याला जवळच्या परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी तहसीलदारांना देण्याची मागणी पवारांनी केली आहे. तसेच कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि लोडशेडिंग थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेतकरी आणि शेतमजुरांसाठी धान्य व चारा अनुदान

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना दरमहा 25 किलो मोफत धान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे, अशीही मागणी आहे.

याशिवाय प्रलंबित जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष निधी, फळबागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी पवारांनी केली आहे.

फळबाग, केळी, ऊस आणि धान उत्पादकांसाठी मदतीची मागणी

फळबाग, केळी, ऊस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वाळण्याच्या स्थितीत असलेल्या फळबागांना वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, असेही पवारांनी म्हटले आहे.

तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा

दुष्काळाच्या तीव्रतेवर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी आणि आवश्यक निर्णय घेता यावेत, यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना दसरा-दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुष्काळ निवारणासाठीचा निधी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने वर्ग करून निधीच्या वापराचे विकेंद्रीकरण करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.

शरद पवारांनी यापूर्वी 18 सप्टेंबर रोजीही मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती. आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्यांनी 17 मागण्यांचे निवेदन सरकारकडे सादर केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button