केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये आंदोलन
आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगीची मागणी; संविधानाला अनुरूप आणि शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याचा पत्रातून दावा

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, 2 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आंदोलनासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांच्या वतीने शिवाजी पार्क पोलिसांना हे पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं, ही ताकद आमच्याकडे’; रामदास आठवले यांचा दावा
‘आंदोलन शांततापूर्ण असेल’
शिवाजी पार्क पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रस्तावित आंदोलन संविधानाला अनुरूप आणि शांततापूर्ण पद्धतीने करण्यात येणार असल्याचे CJPकडून नमूद करण्यात आले आहे. आंदोलनासाठी आवश्यक पोलिस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून गेल्या काही महिन्यांत विविध राजकीय आणि सामाजिक गटांकडून आंदोलने झाली आहेत. CJPनेही यापूर्वी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर आंदोलन केले होते. जुलैमध्ये दिल्लीतील त्यांच्या आंदोलनाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली होती.
आता मुंबईत पुन्हा आंदोलनाची तयारी करण्यात आली असून, 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळते का, याकडे लक्ष लागले आहे.




