स्वीडनच्या संसदेत पोहोचताच नीला विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य; ‘दहा वर्षांपासून काका-चुलत भावाशी संपर्क नाही’
राधाकृष्ण विखे पाटलांनी अभिनंदनासाठी फोन केला, मात्र त्यापलीकडे कोणताही संबंध नसल्याचा नीला विखेंचा दावा; सुजय विखेंच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचे नाव आता स्वीडनच्या राजकारणातही चर्चेत आले आहे. नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ग्रीन पार्टीच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आल्या. त्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.
नीला यांच्या निवडीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. मात्र, आता नीला विखे यांनी काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे.
‘दहा ते बारा वर्षांपासून संपर्क नाही’
स्टॉकहोममधून PTIशी बोलताना नीला विखे यांनी सांगितले की, गेल्या १० ते १२ वर्षांपासून काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क नाही. भारतात त्या नियमितपणे येत असल्या तरी त्यांची त्यांच्याशी भेट किंवा साधा संवादही होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नीला यांनी पुढे सांगितले की, स्वीडनच्या संसदेत निवडून आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना फोन करून अभिनंदन केले. मात्र, त्या फोनपुरताच संवाद झाला असून त्यापलीकडे कौटुंबिक किंवा राजकीय संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा’चा संदेश देत सायबर जनजागृती सामूहिक उपक्रम
‘माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न’
सुजय विखे पाटील यांच्या एका व्हिडीओचा संदर्भ देत नीला यांनी त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. आपल्या स्वीडनमधील राजकीय यशाचा संबंध विखे पाटील कुटुंबाच्या राजकीय वारशाशी जोडला जात असल्याचे त्यांना मान्य नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
नीला यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबतही भाष्य केले. आपले राजकारण आणि कुटुंबातील काही सदस्यांचे राजकारण वेगळे असल्याचे सांगत, आपण ज्या पक्षाशी बांधील आहोत त्याच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
स्वीडनच्या राजकारणात नीला विखेंची नवी जबाबदारी
१३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत नीला विखे पाटील स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून निवडून आल्या. त्या यापूर्वी स्वीडिश पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम करत होत्या तसेच स्टॉकहोम सिटी कौन्सिलवरही कार्यरत होत्या.
त्यांच्या निवडीमुळे विखे पाटील कुटुंबाचे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात पोहोचले असताना, नीला यांच्या ताज्या वक्तव्यामुळे कुटुंबातील राजकीय आणि वैयक्तिक संबंधांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.




