TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश; जमीन महसूल, पीक कर्ज, वीजबिल आणि परीक्षा शुल्काबाबत सवलती

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांचा समावेश झाल्याने मोठ्या भौगोलिक क्षेत्राला दुष्काळी सवलती आणि मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि इतर पिकांवरही पावसाअभावी परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पीक परिस्थितीची पाहणी केली होती.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रभावित शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती यांचा समावेश आहे.

तसेच कृषीपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत देण्यात येणार आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, आता त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांनाही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.

हेही वाचा –  स्वीडनच्या संसदेत पोहोचताच नीला विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य; ‘दहा वर्षांपासून काका-चुलत भावाशी संपर्क नाही’

दुष्काळाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक रोजगाराची कामे उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जाणार आहेत. त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच पशुधनासाठी पाण्याचे नियोजनही सुरू ठेवण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत भविष्यातील पाणी उपलब्धता वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी याबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशांनुसार नियोजन सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनाम्यादरम्यान पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS आधारित माहिती संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पंचनाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना पुढील मदत देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

दुष्काळ जाहीर झाल्याने पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button