रविवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून जम्बो ब्लॉक

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मेगाब्लॉक रद्द केल्याने दिलासा मिळाल्यानंतर आता मुंबईकरांच्या लोकल प्रवासात पुन्हा अडथळे येणार आहेत. रविवार, २७ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही सेवा रद्द, तर काही लोकल धीम्या किंवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे : मुख्य मार्गावर मेगाब्लॉक
माटुंगा–मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.
CSMTहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. या सेवांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
खोपोलीहून दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली–CSMT लोकल आता दुपारी २.०६ वाजता सुटणार आहे.
हेही वाचा – माथाडी कायदा कायम राहणार; वडाळ्यात ३ हजार कामगारांना हक्काची घरे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हार्बर मार्गावर लोकल सेवा रद्द
कुर्ला–वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक असेल.
CSMTहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत CSMTकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहतील.
ब्लॉकच्या काळात CSMT–कुर्ला–CSMT आणि पनवेल–वाशी–पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे–वाशी/नेरुळ मार्गे प्रवास करण्याची मुभा असेल.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड–भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार, २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.३० या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. विरार/वसई रोड आणि बोरिवली/भाईंदरदरम्यानच्या प्रवाशांना यामुळे वेळापत्रकातील बदलांचा सामना करावा लागू शकतो. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.





