Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

माथाडी कायदा कायम राहणार; वडाळ्यात ३ हजार कामगारांना हक्काची घरे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशी एपीएमसी मार्केटचा पुढील ५० वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास; कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक

ठाणे : माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नाही, तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे २ हजार ८५० ते ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, पणन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, माथाडी कायदा हे कामगारांसाठी सुरक्षा कवच आहे. काही घटकांकडून हा कायदा संपवला जाणार असल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, सरकार हा कायदा अधिक मजबूत करण्याच्या भूमिकेत असून तो संपवला जाणार नाही. त्याचबरोबर माथाडी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अनधिकृत प्रवृत्तींवर कारवाई करण्यासाठी कामगार नेते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

माथाडी मंडळांचे सक्षमीकरण

राज्यातील सर्व ३६ माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया करण्यात आली असून, सुमारे ३ हजार कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात माथाडी कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

वाशी एपीएमसीचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास

वाशी एपीएमसी मार्केटला सुमारे ५० वर्षे पूर्ण झाली असून, पुढील ५० वर्षांचा विचार करून या बाजारपेठेचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. पुनर्विकासासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक त्या सुविधा विकसित करण्यासह एफएसआयची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. आधुनिक बाजारपेठेमुळे व्यापाराचा विस्तार होऊन माथाडी कामगारांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे प्रमुख घटक असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण वाढले तरी माथाडी कामगारांचे महत्त्व कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कामगारांच्या पुढील पिढीने शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनिअर, सीए आणि सनदी अधिकारी यांसारख्या क्षेत्रांत पुढे जावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून योजना आखण्याचेही त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button