दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधांवर भर; सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश

नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवर २० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, आदित्य मिरखेलकर, सिंगा रेड्डी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे नियोजन करावे, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुयायांसाठी प्रस्तावित सुविधांचे सादरीकरण करण्यात आले.
जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष
दीक्षाभूमी परिसरात अनुयायांच्या निवासासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षांमध्ये पंखे, कुलर्स, प्रकाशयोजना तसेच अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या निवारा कक्षांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत.
निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्याची ‘भीमसृष्टी’ उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर तक्रार निवारण केंद्र, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि बालकांसाठी खेळण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; विदर्भाला अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला दिलासा
आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष
अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधसाठा, वैद्यकीय कक्ष, मोबाईल रुग्णालये आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील.
परिसरातील स्वच्छतेसाठी नियमित स्वच्छता, जंतुनाशक आणि डास प्रतिबंधक फवारणी, मोबाईल स्वच्छतागृहे तसेच पुरेशा कचराकुंड्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा
अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे. अनुयायांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक, दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश डॉ. कांबळे यांनी बैठकीत दिले.




