‘आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले’; संकटातील बळीराजाला मदतीसाठी सरकार कमी पडणार नाही : कृषिमंत्री दत्ता भरणे
संगमनेरच्या पिंपळे गावात करपलेल्या पिकांची कृषिमंत्र्यांकडून पाहणी; पीकविमा, कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तातडीने देण्याच्या सूचना

संगमनेर : राज्यातील पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी गुरुवारी संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावात शेतात जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी केली. ‘मंत्री असलो तरी आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे,’ असे सांगत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कमी पडणार नाही, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
पिंपळे येथे झालेल्या पाहणीदरम्यान आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांच्यासह कृषी, महसूल, महावितरण आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावण्याऐवजी स्वतः त्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा सूचना भरणे यांनी दिल्या.
गेल्या वर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागला, तर यंदा पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे भरणे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार काही मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीची मदत घ्यावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच चारा छावण्या सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत शासन लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘पनीर’ नाव वापरण्यावर FSSAIचा मोठा निर्णय; दूध नसलेल्या पनीरवर प्रस्तावित बंदी
पीकविमा आणि कर्जमाफीचा लाभ तातडीने द्या
पात्र शेतकऱ्यांना पीकविमा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळवून द्यावा, अशा स्पष्ट सूचना कृषिमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले की, विरोधक टीका करतात, ते त्यांचे काम आहे; मात्र सरकार आपले काम करत आहे. शेतकरी संकटात असताना राजकारण करण्याची ही वेळ नसून, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घ्यावी. तसेच संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली.





