बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांचा संप; शाखेतील महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन

मुंबई : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे या कालावधीत बँकांच्या नियमित शाखा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे महत्त्वाचे व्यवहार संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर काही बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. संपामुळे शाखेतील नियमित सेवा प्रभावित होऊ शकतात, अशी माहिती या सूचनांमधून देण्यात आली आहे. त्यामुळे रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेकशी संबंधित कामकाज, कागदपत्रांची पूर्तता तसेच शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावयाचे इतर व्यवहार असल्यास ग्राहकांनी त्यांचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे.
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी
बँक कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही प्रमुख मागणी असल्याची माहिती आहे. सध्या बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना काही शनिवारी काम करावे लागते. त्यामुळे शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी देऊन पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय कर्मचारी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांकडे सरकार आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.
हेही वाचा – दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत द्या; रोहित पवारांचा सरकारला १०-१२ दिवसांचा अल्टिमेटम
डिजिटल बँकिंगचा पर्याय उपलब्ध
संपामुळे शाखेतील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असली तरी ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अनेक नियमित व्यवहार ATM, UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतात.
रोख रकमेची गरज असल्यास ग्राहक ATMचा वापर करू शकतात. पैसे पाठवण्यासाठी UPI, मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र संपाच्या काळात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा सेवा व्यत्यय येण्याची शक्यता लक्षात घेता, अत्यावश्यक व्यवहार २८ सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी अधिक सोयीचे ठरू शकते.





